बीड : गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. या सर्व प्रकाराला तहसीलदारांचाच आशिर्वाद असून महसूल व पोलिस प्रशासनातील काही अधिकारी मिळून हे अवैध वाळू उपशाचे सिंडीकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप आ. विजयसिंह पंडित यांनी केला आहे. या प्रकरणात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तक्रार करत एसआयटी स्थापन करण्याची मागणार करणार असल्याचे देखील आ. विजयसिंह पंडित यांनी म्हटले आहे.
गेवराई तालुक्यातून गोदावरी नदी वाहते. जवळपास शंभर किलोमीटरचा हा परिसर आहे. काही वाळूघाटांचे शासनाने लिलाव केले असून त्या ठिकाणाहून वाळू उपसा केला जातो. परंतु कागदोपत्री असलेल्या नोंदीपेक्षा अधिकचा वाळू उपसा करुन त्या माध्यमातून कोट्यावधींची माया जमवली जात आहे.
शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडण्याबरोबरच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. राक्षसभुवन सारख्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या तिर्थक्षेत्राला देखील यापासून धोका निर्माण झाला आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथून गेवराई आणि जिल्ह्यातील इतर पंचायत समिती अंतर्गतच्या सोळाशे घरकुलांसाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
परंतु संबंधीत घरकुल धारकांना या वाळूसाठी ओटीपी पाठवला जातो, व ठराविक रक्कम घेवून त्यांच्याकडून हा ओटीपी घेतला जातो. यानंतर त्यांच्या नावावर पाच ब्रास वाळू उपसा करुन ती इतरत्र विक्री केली जाते, या प्रत्येक गाडीमागे सात ते आठ हजार रुपये तहसीलदार स्विकारत आहेत असा आरोप आ. विजयसिंह पंडित यांनी केला आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचेच हायवा ?
गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन त्याची वाहतूक करण्यासाठी काही पोलिस अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने घेतलेले हायवा चालत असल्याचा गंभीर आरोप आ. विजयसिंह पंडित यांनी केला आहे. याबाबत आपल्याकडे असलेले पुरावे प्रशासनास देणार असल्याचे देखील आ. विजयसिंह पंडित यांनी म्हटले आहे.