Vandalism occurred at the Gram Panchayat office in Suleman Deola, Ashti taluka, on Friday night.
आष्टी, पुढारी वृत्तसेवा: आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी रात्री झालेल्या तोडफोडीच्या आणि जाळपोळीच्या धक्कादायक प्रकाराने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. अज्ञात दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने हातात कुऱ्हाड घेऊन ग्रामपंचायतीचे कुलूप तोडले, कार्यालयात घुसून दस्तऐवजांची उधळण केली आणि त्यानंतर त्यांना पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे.
या आगीत सुमारे ४० ते ५० रजिस्टर, महत्वाच्या फाईल्स आणि अधिकृत कागदपत्रे जळून खाक झाल्याने प्रशासनाची मोठी हानी झाली आहे. हा प्रकार कोणत्या हेतूने करण्यात आला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक यांना माहिती दिली. त्यानंतर आज ग्रामविकास अधिकारी मुळीक, सरपंच दादा यदु घोडके, अतुल पोपट घोडके, भिमराव सुखदेव भादवे, सचिन भगवान खोरदे, नवनाथ व एकनाथ भोजे आदी पंचांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक यांनी सांगितले की, या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदी, योजना आणि नागरिकांच्या कामकाजाशी संबंधित मोठ्या प्रमाणावरचे दस्तऐवज जळाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावात या घटनेबाबत मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.