Valmik Karad's setup from jail to implicate MP's son in Vilas Ghule murder case
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभसोनवणे याला घुले प्रकरणात अडकवण्यासाठी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने चक्क जेलमधून सेटिंग लावल्याचे समोर आले आहे.
याबाबत खा. सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन कराडने जेलमधून सुग्रीव कराड याला फोन करत मुलगा सौरभ सोनवणे याला घुले प्रकरणात अडकवण्यासाठी वाटेल ते करा अशा सूचना दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. विशेष म्हणजे याबाबत वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यात संभाषण झालेली एक ऑडिओ क्लिपदेखील खा. सोनवणे यांनी ऐकवली आहे.
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची २१ जून रोजी चाकूचे वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप विलास घुले यांच्या नातेवाईकांनी केला होता.
तसेच या प्रकरणी सौरभसोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलनदेखील करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात आता खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. जेलमधून वाल्मिक कराडने सुग्रीव कराड याला फोन केल्याचा दावा त्यांनी केला असून त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिपही सोनवणे यांनी ऐकवली आहे.
घुले हत्या प्रकरणात आपल्या कट मुलाला अडकवण्याचा रचल्याचा आरोप या संभाषणातून करण्यात आल्याचं सोनवणे म्हणाले. मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवण्यापासून ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन आणि वारंवार रास्ता रोको करण्याच्या सूचना वाल्मिक कराडने दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जेलमधून सूत्र हलवण्याच्या या आरोपांची चौकशी करून वाल्मिक कराड, सुग्रीव कराड याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान खा. सोनवणे यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील वातावरण अधिक तापण्याची चिन्हे असून आता हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर गेल्याचे दिसत आहे.