Vaidyanath Vidyalaya protest pudhari photo
बीड

Beed News : परळीत तिसऱ्या दिवशीही वैद्यनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

शिक्षकांची कमतरता, मुख्याध्यापकांचा अभाव, रखडलेले वेतन

पुढारी वृत्तसेवा

परळी: परळीतील ऐतिहासिक वैद्यनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. शिक्षकांची कमतरता, नियमित मुख्याध्यापक नसणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन आणि व्यवस्थापनातील अनिश्चितता या प्रश्नांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन कायम ठेवले आहे. शिक्षणासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागत असल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, अनेक विषयांना पुरेसे शिक्षक नसल्यामुळे नियमित तासिका होत नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि आगामी परीक्षांच्या तयारीवर होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुमारे नऊ महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे यापूर्वी शिक्षकांनीही आंदोलन केले होते. मात्र, या प्रश्नावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याचे सांगितले जात आहे.

व्यवस्थापनाशी संबंधित वादामुळे प्रशासकीय निर्णय प्रक्रिया ठप्प झाल्याची चर्चा असून, नियमित मुख्याध्यापक नसल्याने शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. समायोजन प्रक्रियेनंतर शिक्षकांची संख्या कमी झाल्याने उर्वरित शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. सलग तिसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होत असलेले नुकसान थांबविण्यासाठी शिक्षण विभाग, संबंधित प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाने तातडीने हस्तक्षेप करून शिक्षकांची उपलब्धता, नियमित मुख्याध्यापकांची नियुक्ती आणि रखडलेल्या वेतनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशीही आंदोलन कायम असल्याने या प्रश्नाकडे आता जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग कोणत्या भूमिकेतून पाहणार, याकडे संपूर्ण परळी शहराचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन कधी थांबणार आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण पूर्ववत कधी होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT