New Education Policy | शिक्षण आनंददायी होण्यासाठी...

New Education Policy |
New Education Policy | शिक्षण आनंददायी होण्यासाठी...
Published on
Updated on

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यावर्षी प्रथमच दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. विविध कृती, उपक्रम, प्रकल्प आणि निरीक्षणाधारित कामांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर विविध राज्यांनी त्यानुसार कार्यवाही सुरू केली. प्रशासकीय स्तरावर अनेक बदल घडत असताना या धोरणाचा सर्वाधिक परिणाम शैक्षणिक प्रक्रियेवर होताना दिसतो. कोणतेही शैक्षणिक धोरण यशस्वी ठरते की नाही, याचे मूल्यमापन केवळ कागदोपत्री बदलांवर होत नाही. वर्गात विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत काय बदल घडतो, यावर त्याचे खरे मूल्य ठरते. त्यामुळे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम किंवा प्रशासकीय रचना यांपेक्षा वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत नेमका काय बदल घडतो, हे अधिक महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्रात यावर्षी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर बालभारतीने नव्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली असून प्रथमच एकाच वेळी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके बदलण्यात आली आहेत. शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम बदलले, तरी समाजात सर्वाधिक चर्चा पाठ्यपुस्तकांवरच होत असते. कारण, शिक्षण व्यवस्थेतील बदलांचे सर्वात ठोस आणि प्रत्यक्ष प्रतिबिंब पाठ्यपुस्तकांमधूनच दिसून येते. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठीही पाठ्यपुस्तके ही शिक्षण व्यवस्थेची सर्वात दृश्यमान बाजू असते.

पाठ्यपुस्तकांचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो. कोठारी आयोगाने म्हटले होते की, उद्याचा भारत आज वर्गखोलीत घडत असतो. त्या भावी भारताच्या हातात आपण नेमके काय देतो आहोत, याला विशेष महत्त्व आहे. कारण, त्याच पिढीच्या हाती देशाचे भविष्य असणार आहे. हे भविष्य घडवण्यात पाठ्यपुस्तके महत्त्वाची भूमिका बजावत असतात. महाराष्ट्रात गेली साठ वर्षे बालभारती ही संस्था पाठ्यपुस्तकनिर्मितीचे कार्य करत आहे. हे वर्ष बालभारतीचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. या कालावधीत महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांची जडणघडण करण्यात या संस्थेचे मोठे योगदान राहिले आहे. विद्यार्थ्यांचे भावनिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक समृद्धीकरण करण्याचे कार्य पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून सातत्याने झाले आहे.

स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही भारतीय शिक्षणव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पाठ्यपुस्तककेंद्रित आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञांनी चौकटीबाहेरच्या शिक्षणाचा आग्रह धरला असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्याची अंमलबजावणी मर्यादित स्वरूपातच दिसते. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेत किंवा समाजमनात बदल घडवून आणायचा असेल, तर पाठ्यपुस्तके आजही प्रभावी माध्यम ठरतात. देशातील प्रचंड विविधतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिकण्यात काही प्रमाणात समानता निर्माण करण्याचे कामही पाठ्यपुस्तकांनी केले आहे. तथापि, पाठ्यपुस्तके ही शिक्षणाची साधने आहेत. अंतिम साध्य नाहीत, हे सतत लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणूनच पाठ्यपुस्तके किती गुणवत्तापूर्ण, समृद्ध आणि विद्यार्थीकेंद्रित आहेत, याला विशेष महत्त्व प्राप्त होते. साहित्य निवड, आशय, चित्रे, स्वाध्याय, उपक्रम आणि मूल्यमापनासाठीचे प्रश्न यांचा विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर थेट परिणाम होत असतो.

यावर्षीच्या पाठ्यपुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे, जीवनाशी नाते सांगणारे आणि विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या पलीकडे जाऊन शिकण्यास प्रवृत्त करणारे अध्ययन-अनुभव. विविध कृती, उपक्रम, प्रकल्प आणि निरीक्षणाधारित कामांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिकण्याचे अनेक मार्ग विद्यार्थ्यांसमोर खुले करण्याचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकांत दिसून येतो. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा परिसरही शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असू शकतो, ही जाणीवही त्यातून करून दिली जाते. यावर्षीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केंद्र सरकारने सूचित केलेल्या अध्ययन निष्पत्तींचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येक इयत्ता आणि विषयासाठी निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्ती अभ्यासक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या आहेत. त्या साध्य करण्यासाठी विविध कृती, प्रश्न, स्वाध्याय, सहशालेय उपक्रम आणि मूल्यमापनाची साधने यांची रचना करण्यात आली आहे. शिक्षकांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रत्येक पाठातून कोणत्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहेत, हे स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे.

पाठ आणि कवितांच्या प्रत्येक पानावर शिक्षकांनी कोणत्या प्रकारचे अध्ययन अनुभव द्यावेत, याविषयीही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे; मात्र या सूचना दिशादर्शक स्वरूपाच्या असून स्थानिक परिस्थिती, भाषा, लोकसंस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षकांना आवश्यक ते स्वातंत्र्य देण्यात आले आहे. समानतेचा आग्रह धरताना विविधतेचे भान राखण्याचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकांमध्ये दिसून येतो. विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देण्यासाठी अनेक ठिकाणी ‌'तुम्हाला काय समजले?‌’, ‌'तुम्हाला काय वाटते?‌’ अशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची, निरीक्षणे नोंदवण्याची आणि सर्जनशीलतेकडे वाटचाल करण्याची संधी मिळते.

पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरही जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कात्रणांचे संकलन, निरीक्षण, मित्रांशी संवाद, निमंत्रण पत्रिका, शुभेच्छा संदेश, जाहिराती, बातम्या यांसारख्या विविध लेखन प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. स्थानिक गरजांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना स्वतःचे लेखन करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे. तसेच आंतरजाल, ग्रंथालय आणि ज्येष्ठांशी संवाद यांसारख्या माध्यमांचा वापर करून माहिती संकलित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांच्या रचनात्मक बाजूकडे पाहिले, तर मुखपृष्ठापासूनच विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला स्पर्श करण्याचा प्रयत्न दिसून येतो. बहुरंगी चित्रे, कार्टून शैलीतील रेखाचित्रे आणि वयोगटानुसार केलेली मांडणी यामुळे पुस्तके अधिक आकर्षक झाली आहेत. मुलांच्या शिकण्यामध्ये चित्रांचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन दृश्यात्मकतेला विशेष स्थान देण्यात आले आहे.

राज्यातील विविध बोली भाषांचा परिचय करून देण्याचाही प्रयत्न मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांत करण्यात आला आहे. सर्व बोली भाषांचा समावेश शक्य नसला, तरी त्यांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, हा उद्देश त्यामागे दिसून येतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने स्थानिक भाषा आणि बोली भाषांच्या संवर्धनावर दिलेल्या भराचे हे प्रतिबिंब म्हणता येईल. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि सामाजिक सुरक्षिततेचाही विचार या पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. टेली मानस हेल्पलाईन, मनोदर्पण, चाईल्ड हेल्पलाईन यांसारख्या उपयुक्त माहितीचा समावेश करण्यात आला आहे. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याविषयी जागरूकता निर्माण करणारी माहितीही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, सुरक्षितता आणि आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रयत्न आहे.

समग्र विचार करता यावर्षीची पाठ्यपुस्तके केवळ विषय शिकवण्यापुरती मर्यादित राहत नाहीत. शिकताना विद्यार्थ्यांनी त्या पलीकडे डोकवावे, परिसराशी संवाद साधावा, विचार करावा, व्यक्त व्हावे आणि शिक्षणाचा आनंद घ्यावा, यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे; मात्र या सर्व शक्यता प्रत्यक्षात आणण्यासाठी पाठ्यपुस्तके सूक्ष्मपणे समजून घेणे आणि त्यातील संकेतांचा प्रभावी वापर करणे तितकेच आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news