नेत्यांची अकाली एक्झिट आणि बीडच्या विकासाचे अधुरे स्वप्न pudhari photo
बीड

Ajit Pawar death : नेत्यांची अकाली एक्झिट आणि बीडच्या विकासाचे अधुरे स्वप्न

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विनायक मेटेनंतर पवारांच्या निधनाने मोठी हानी

पुढारी वृत्तसेवा

उदय नागरगोजे

बीड ः मागासलेला बीड जिल्हा ते विकासीत बीड जिल्हा असा बदल घडवून आणण्याची ज्या नेत्यांमध्ये धमक होती, त्या नेत्यांच्या अपघाती एक्झीटच्या घटना बीडकरांच्या मनाला चटका लावून गेल्या. भाजप नेते स्व.प्रमोद महाजन, स्व.गोपीनाथ मुंडे, स्व.विनायक मेटे आणि आता बीडचे पालकत्व स्विकारत बीडला विकासाचे व्हीजन दाखवणाऱ्या अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने बीडची मोठी हानी झाली असेच म्हणावे लागेल.

शेती सिंचनासाठी असलेला प्रकल्पांचा अभाव, औद्योगिकदृष्ट्या मागास, रेल्वे, विमान अशा सेवांपासून वंचित असलेला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. ही ओळख पुसण्यासाठी आजवर विविध पक्षातील विविध नेत्यांनी प्रयत्न केले. बीडमध्ये विविध प्रकल्प निर्मिती करुन सिंचन क्षेत्र वाढवले, बीडला रेल्वे सेवा सुरु करण्यासाठीचे प्रयत्न असतील अथवा इतर क्षेत्रातील विकासात्मक कामे असतील, यात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नेत्यांनी हातभार लावला. परंतु यातही बीडकरांना ज्या नेत्यांकडून अपेक्षा होत्या, जे नेते आपल्याकडे असलेल्या पदाच्या माध्यमातून बीडचा सर्वांगीण विकास करु शकत होते,अशा नेत्यांची अपघाती एक्झीट बीडकरांना चटका लावून गेली.

यामध्ये सर्वात आधी उल्लेख करावा लागेल तो भाजपा नेते स्व.प्रमोद महाजन यांचा. महाजन यांचा मृत्यू हा वेगळ्या कारणामुळे झाला असला तरी त्यांच्या अशा अचानकपणे जाण्याने बीडचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर स्व.गोपीनाथ मुंडे आणि बीड हे नाते अतुट होते. जेव्हढे प्रेम बीडच्या जनतेने या लोकनेत्यावर केले, त्याची उतराई म्हणून या नेत्याने बीडच्या विकासासाठी जे काही करता येईल ते पूर्ण क्षमतेने केल्याचे बीडकर आजही सांगतात.

राज्याचे विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, खासदार अशा वेगवेगळ्या पदांवर असतांना स्व.मुंडे यांनी बीडच्या विकासाचा ध्यास घेत काम केले. त्यांच्या केंद्रात मंत्री होण्याने बीडच्या मागासलेपणाचा शिक्का पुसला जाईल, बीडसाठी आता केंद्रातून आणि राज्यातूनही निधी येईल अशी अपेक्षा असलेल्या बीडकरांनी त्यांच्या स्वागतासाठी 3 जून रोजी मोठी तयारी केली होती, परंतु दिल्लीत झालेल्या कार अपघातात त्यांचे निधन झाले आणि स्वागतासाठीचे हार श्रद्धांजलीसाठी अर्पण करण्याची दुर्देवी वेळ बीडकरांवर आली.

असाच काहीसा प्रकार स्व.विनायक मेटे यांच्या बाबतही घडला. स्व.मेटे हे आमदार म्हणूनच कार्यरत असले तरी राज्याच्या मंत्रीमंडळातील एकही मंत्री त्यांचा शब्द टाळत नव्हता. त्यांच्या राजकीय वलयाची अनुभूती बीडमधील अनेकांनी घेतली होती. विशेषतः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर स्व.मेटे आग्रही असायचे. याच संदर्भातील बैठकीसाठी जातांना मुंबईजवळ त्यांचे अपघाती निधन झाल्याने बीडकरांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता.तर अतिशय वेगळ्या राजकीय परिस्थितीत, बीडचा पालकमंत्री कोण होणार, असा प्रश्न निर्माण झालेला असतांना स्वतः अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्विकारले.

यानंतर अगदी पहिल्या दौऱ्यापासून ते अगदी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या दौऱ्यापर्यंत प्रत्येक वेळी बीडच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणा करण्याबरोबरच त्यासाठी ठोस निधीची तरतूद आणि त्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यावर भर दिला होता. अजित पवार हे मुळ बीडचे नसले तरी बीडकरांना विकासाचे व्हीजन दाखवणारे, बीडचे पालक बनले होते, त्यांच्या अशा निधनाने बीडकरांची कधीही भरुन न येणारी हानी झाली.

विमानात बसतांना सूचना, उतरेपर्यंत मंजुरी!

अजित पवार हे बीडच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशिल असायचे, नुकत्याच झालेल्या त्यांच्या बीड दौऱ्यापूर्वी त्यांनी थेट मंत्रालयात फ ोन करून मी आता बीडला जाणार आहे, संभाजीनगरला विमानतळावर उतरेपर्यंत मला मंजुरी हवी आहे असे आदेश दिले. दादांचे आदेश मिळताच मंत्रालयातील यंत्रणा कामाला लागली आणि दादा संभाजीनगरला उतरताच मंजूरीचा ई मेल त्यांना मिळाला, बीडमध्ये पोहचताच दादांनी बीडच्या नाट्यगृहासाठी मंजूर केलेल्या या निधीबाबतची हकिगत सांगितली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT