Dharur Ghat Body Found Pudhari
बीड

धारूर घाटात दरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू

पुढारी वृत्तसेवा

Dharur Ghat Body Found

धारूर : धारूर घाटात रस्त्यापासून सुमारे २० फूट अंतरावरील दरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि.१९) दुपारी चारच्या सुमारास दुचाकीस्वारांच्या निदर्शनास ही घटना आली. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत गूढ कायम आहे. घातपात की अन्य काही कारणामुळे मृत्यू झाला, याचा तपास धारूर पोलीस करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी काही दुचाकीस्वार धारूर घाटातून प्रवास करीत असताना त्यांना रस्त्यापासून काही अंतरावरील दरीत एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. त्यांनी तत्काळ धारूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, उपनिरीक्षक श्रीनाथ गिराम यांच्यासह पोलीस कर्मचारी रमाकांत भुसारी, गोविंद खाडे, रेवन नाथ दुधाने आणि पोलीस मित्र योगेश अंधारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेहातून दुर्गंधी येत असल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह कोणाचा आहे, ही व्यक्ती घाटात कशी पोहोचली आणि तिचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. मृत्यूमागे घातपात आहे की अन्य काही , याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

धारूर घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

धारूर घाट परिसर यापूर्वीही अपघात आणि विविध गंभीर घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. या भागात यापूर्वीही अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळल्याच्या घटना घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घाट परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घाटातील धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे, संवेदनशील भागांमध्ये देखरेख वाढविणे आणि संशयास्पद घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर पोलीस करीत आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि मृत्यूमागील नेमके कारण शोधणे, हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT