Molestation Case Pudhari Photo
बीड

Parli Crime | पोलीस भरतीच्या सरावावरून परतणाऱ्या दोन महिलांचा पाठलाग करून विनयभंग, पतीसोबत झटापट

वैद्यनाथ महाविद्यालयाजवळील मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर घटना; दुचाकी सोडून संशयित फरार

पुढारी वृत्तसेवा

Parli Vaijnath Molestation Case

परळी वैजनाथ : पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सराव करून घरी परतणाऱ्या दोन महिलांचा पाठलाग करून त्यांच्याशी गैरवर्तन व विनयभंग केल्याची धक्कादायक घटना परळी शहरात घडली. महिलांच्या पतीने संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी झटापट करून दोघेही दुचाकी घटनास्थळी सोडून फरार झाले. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण मागील काही महिन्यांपासून पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नियमित धावण्याचा सराव करतात. १८ ऑगस्ट रोजी दोघी वैद्यनाथ महाविद्यालय परिसरात सरावासाठी गेल्या होत्या. सराव आटोपल्यानंतर रात्री सुमारे ७.४५ वाजता त्या परळी-अंबाजोगाई रस्त्याने पायी घरी जात होत्या.

वैद्यनाथ महाविद्यालयाजवळील मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर त्यांच्या मागून दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आल्या. दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तीने तक्रारदाराच्या मैत्रिणीच्या कमरेवर हाताने मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर दोघांनी दुचाकी वळवून पुन्हा महिलांकडे येत गैरवर्तन केले.

घाबरलेल्या महिलांनी तत्काळ आपल्या पतींना फोन करून घटनेची माहिती दिली. पुढे आझाद चौक परिसरात पती आल्यानंतर दोन्ही महिला त्यांच्या मोटारसायकलवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने गेल्या. संशयितही त्याच दिशेने गेले. चौकाजवळ संशयित दिसल्यानंतर महिलांच्या पतीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयितांनी त्यांच्याशी झटापट केली आणि दुचाकी (एमएच ४४ एएफ ५४४३) घटनास्थळी सोडून पलायन केले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी सोडलेल्या दुचाकीचा क्रमांक तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

परळी शहरात व्यायाम आणि धावण्याचा सराव करणाऱ्या महिलांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सकाळी व सायंकाळी सरावासाठी बाहेर पडणाऱ्या महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी संवेदनशील भागात पोलिस गस्त वाढविणे आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT