Parli Vaijnath | परळीत 'शिवपुत्राची'उंची ठरली लक्षवेधी; अडीच फुटांच्या भक्ताने जिंकली परळीकरांची मने!

पहिल्या श्रावणी सोमवारी वैद्यनाथ दर्शनासाठी कर्नाटकातून आगमन; पोलिसांनी गाभाऱ्यात नेऊन घडविले दर्शन, सेल्फीसाठी भाविकांची झुंबड
Parli Vaijnath Karnataka Devotees
कर्नाटकातून परळीत आलेल्या अडीच फुटांच्या ‘शिवपुत्रा’ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेPudhari
Published on: 
Updated on: 

Parli Vaijnath Karnataka Devotees

परळी वैजनाथ : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरच्या दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत. भक्तिभावाने ओथंबलेल्या या वातावरणात विविध रूपांत आलेले भाविक लक्ष वेधून घेत असतानाच कर्नाटकातून आलेल्या अडीच फुटांच्या ‘शिवपुत्रा’ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

कर्नाटक राज्यातील रामपूर येथील शिवपुत्र, (वय ५५) हे अडीच फूट उंचीचे असून काल रात्रीपासून ते वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शनासाठी दाखल झाले होते. प्रचंड गर्दीतही त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे भाविक त्यांच्याभोवती मोठ्या संख्येने जमले. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली.

Parli Vaijnath Karnataka Devotees
Parli Vaijnath Temple| श्रावणात परळी वैद्यनाथ भक्तांना मोठा दिलासा; मेरुगिरी यात्री निवासात मोफत मुक्कामाची सुविधा

शिवपुत्र यांना पाहण्यासाठी भाविकांची उत्सुकता वाढली असतानाच मंदिरातील बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना सुरक्षितपणे उचलून गाभाऱ्यात नेले आणि वैद्यनाथाचे दर्शन घडविले. प्रत्यक्ष ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थित भाविकही भावूक झाले.

शारीरिक उंची अडीच फूट; मात्र मनोबल आभाळाएवढे!

शिवपुत्र हे केवळ वैद्यनाथ भक्त म्हणूनच नव्हे, तर सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणूनही परिचित आहेत. ते रीलस्टार असून यूट्यूबसह विविध सामाजिक माध्यमांवर त्यांचे चॅनेल्स आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून ते कर्नाटकात लोकप्रिय झाले आहेत.

आपल्या शारीरिक व्यंगाकडे न्यूनगंडाने न पाहता त्यातूनच इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा दृष्टिकोन त्यांनी जपला आहे. “माझ्या शारीरिक व्यंगावर मला कोणताही न्यूनगंड वाटत नाही. उलट माझ्यामुळे असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. हा आनंद वाटण्यासाठीच भगवंताने माझी निवड केली आहे,” अशी भावना शिवपुत्र यांनी व्यक्त केली.

Parli Vaijnath Karnataka Devotees
Parli Vaijnath: परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावणात दाखल होतात लाखो भाविक; देवस्थान समितीकडून जय्यत तयारी सुरू

परळीकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “परळीकरांनी मला खूप प्रेम दिले. वैद्यनाथाचे दर्शन घेऊन मी धन्य झालो,” असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

अडीच फुटांची शारीरिक उंची असली, तरी आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भक्तीच्या बळावर शिवपुत्र यांनी मनांची उंची गाठली. पहिल्या श्रावणी सोमवारी त्यांची उपस्थिती वैद्यनाथ मंदिर परिसरातील भाविकांसाठीही आकर्षणाचा आणि प्रेरणेचा विषय ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news