Girl Missing Case Pudhari
बीड

Missing Girls Beed | केज तालुक्यात दोन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ

केज तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Missing Girls Case Kej Taluka

केज : केज तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी एक मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन असून दुसरी १९ वर्षांची तरुणी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पहिल्या घटनेत, दि. ११ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास तुकुचीवाडी (ता. केज) येथील आठवीत शिकणारी १४ वर्षांची मुलगी घरात आईजवळ झोपलेली होती. रात्री तिचे वडील शेतातील पिकांची राखण करून घरी परतले असता मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र मुलगी कुठेही आढळून आली नाही.

संबंधित मुलीचा रंग गोरा, उंची अंदाजे साडेचार फूट असून अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, काळी पॅन्ट, गुलाबी ओढणी व पायात स्लीपर चप्पल होती. तिचे केस काळे व लांब आहेत. अज्ञात व्यक्तींनी मुलीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

दुसऱ्या घटनेत, दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास बोबडेवाडी (ता. केज) येथील १९ वर्षांची तरुणी शेतमजुरांचे मजुरीचे पैसे देण्यासाठी गावात गेली होती. बारावीची परीक्षा दिलेली ही तरुणी त्यानंतर घरी परतली नाही. तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. संबंधित तरुणीचा रंग सावळा, उंची अंदाजे साडेचार फूट असून अंगात निळा टॉप, पांढरी पॅन्ट व पायात सँडल होते. तिचे केस काळे व लांब आहेत.

या दोन्ही प्रकरणांचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT