Transfer Vishnu Chate to Beed jail
बीड, पुढारी वृत्तसेवा: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूर कारागृहात आहे. तेथून त्याला बीडच्या कारागृहात आणण्यात यावे, यासाठी वकिलांनी युक्तिवाद केला. आता या प्रकरणाची ट्रायल सुरू होणार असून तत्पूर्वी विष्णू चाटेला बीड कारागृहात आणण्यात यावे अशी मागणी वकिलांनी केली, त्याला सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला.
केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणाची सुनावणी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात न्या. व्यकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुरु आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत विष्णु चाटे याचे वकील सचिन शेप, राहुल मुंडे व कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. तर सरकारी पक्षाकडून अॅड. उज्वल निकम यांनी व्हीसीद्वारे तर बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयात हजर राहत युक्तीवाद केला. यावेळी विष्णु चाटे याला बीड न्यायालयात आणण्यात यावे या मागणीच्या अर्जावर युक्तीवाद झाला.
यावेळी अॅड. कुलकर्णी यांनी विष्णु चाटे याच्या मागणीवर न्यायालयाने विचार करावा व वकिलांशी त्याचा थेट संवाद व्हावा तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहता यावे याकरिता बीड कारागृहात हलवण्यात यावे असा युक्तीवाद केला. तसेच लातूर येथून विष्णु चाटे याला बीडला आणावयाचे असेल तर या दरम्यान मसाजोग हे गाव असून त्या ठिकाणाहून आरोपीला आणतांना काही अप्रिय घटना घडू शकते, असे देखील नमुद केले.
यावर अॅड. उज्वल निकम यांनी जोरदार आक्षेप घेत आरोपीला कोणत्या कारागृहात ठेवायचे हा पूर्णपणे प्रशासकीय अधिकार आहे, त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही. तसेच विष्णु चाटे याचा यापूर्वीचा एक अर्ज रद्द करण्यात आलेला आहे, तोच निर्णय अंतिम समजण्यात यावा असा युक्तीवाद केला. तसेच कारागृह प्रशासनाने अतिरिक्त कैदी असल्याबाबतच्या अभिप्रायाकडे देखील कोर्टाचे लक्ष वेधले. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर आता पुढील सुनावणी २१ फे ब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
लॅपटॉप, अहवाल आला, पण...!
सरकारी पक्षाकडून लॅपटॉपचा अतिरिक्त पुरावा सादर करण्यात आला होता. परंतु तो लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याने त्यातील तपशील आरोपीच्या वकिलांना मिळत नव्हता. याच मुद्यावरुन गत चार सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवत लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्याची मागणी केली होती.
अखेर शनिवारी झालेल्या सुनावणीवेळी तपास अधिकाऱ्यांनी हे लॅपटॉप आणि अहवाल प्राप्त झाल्याची माहिती न्यायालयासमोर दिली असता न्यायालयाने त्याच्या कॉपी आरोपीच्या वकिलांना द्याव्यात असे निर्देश दिले. परंतु शनिवारी सायंकाळपर्यंत याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याची माहिती असून आता सरकारी वकिल, तपास अधिकारी व आरोपीचे वकील यांना मंगळवार दि. १० रोजी न्यायालयात बोलावण्यात आले असून न्यायालयीन अधिक्षकांच्या समोर या लॅपटॉपच्या क्लोन कॉपी आरोपींच्या वकिलांना दिल्या जाणार आहेत, आरोपीचे वकिल त्या पुराव्यावरील आपले म्हणणे मांडणार आहेत.