Tiger spotted in Ashti area; Footprints found on August 3
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील डोंगराळ व वनक्षेत्रात वाघाचा वावर असल्याचे समोर आल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ३ ऑगस्ट रोजी या भागात वाघाच्या पाऊलखुणा स्पष्टपणे आढळून आल्या आहेत. मात्र, आतापर्यंत वाघाकडून कोणत्याही व्यक्तीवर हल्ला झालेला नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
वनक्षेत्र अधिकारी मुंडे यांनी सांगितले की, संबंधित वाघ सध्या त्या परिसरातून दूर निघून गेला असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. वनविभागाकडून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. आष्टी तालुक्यातील डोंगराळ आणि जंगल परिसरात यापूर्वीही वाघ व बिबट्यांचा वावर आढळून आला आहे. या भागात रानडुकरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्याकडून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली जात आहे.
यामुळे आधीच वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आता वाघाच्या पाऊलखुणा मुळे भीती वाढली आहे. शेतीच्या कामासाठी पहाटे किंवा सायंकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः एकट्याने जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा अथवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये. गर्दी करून प्राण्याला चिथावणी देऊ नये, जंगल व डोंगर परिसरात विशेषतः सकाळी आणि सायंकाळी जाताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. वाघ अथवा अन्य वन्यप्राणी दिसल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. अफवा पसरवू नयेत आणि सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. दरम्यान, वाघाच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वनविभागाने आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांतून होत आहे.
वनविभागाने सतर्क राहण्याची गरज
मानवावर हल्ला झालेला नसला तरी वाघाचा वावर असलेल्या परिसरात वनविभागाने केवळ नागरिकांना घाबरू नये, असे आवाहन करण्यापेक्षा प्रत्यक्ष गस्त, पाऊलखुणांचे निरीक्षण, कॅमेरा ट्रॅप आणि आवश्यक ठिकाणी वनकर्मचाऱ्यांची तैनाती वाढविण्याची गरज आहे. वाघाची हालचाल नेमकी कोणत्या दिशेने आहे, याबाबत ग्रामस्थांना वेळोवेळी माहिती देणेही महत्त्वाचे ठरणार आहे.