NASA-ISRO trip : नासा-इस्रो सहलीसाठी धारूरच्या तीन विद्यार्थ्यांची निवड ! file photo
बीड

NASA-ISRO trip : नासा-इस्रो सहलीसाठी धारूरच्या तीन विद्यार्थ्यांची निवड !

राजवीर सोळंकेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; कृष्णा भोसले, रचना भिसे यांचीही झाली निवड

पुढारी वृत्तसेवा

Three students from Dharur selected for a NASA-ISRO trip!

धारूर, पुढारी वृत्तसेवा : अवकाश विज्ञानाची गगनभरारी घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धारूर तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. नासा (NASA) आणि इस्रो (ISRO) या प्रतिष्ठित अवकाश संशोधन संस्थांच्या शैक्षणिक सहलीसाठी तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जिल्हास्तरीय अंतिम निवड चाचणीत चमकदार कामगिरी करत या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याने धारूरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या निवड प्रक्रियेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिंगणी येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी राजवीर आर. सोळंके याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची नासा आणि इस्रो अशा दोन्ही शैक्षणिक सहलींसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद शाळा, असोला येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी कृष्णा एस. भोसले याची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली.

तर जिल्हा परिषद शाळा, अरणवाडी येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी रचना पी. भिसे हिने कन्या राखीव प्रवर्गातून इस्रो सहलीसाठी पात्रता मिळविली आहे. शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंतिम निवड चाचणीचा निकाल जाहीर झाला असून, राज्यातील ११ तालुक्यांमधून नासा सहलीसाठी प्रत्येकी एका विद्यार्थ्यांची, तर इस्रो सहलीसाठी प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

इस्रो सहलीच्या निवड प्रक्रियेत गुणवत्ता यादीतील पहिल्या दोन विद्यार्थ्यांसह तालुक्यात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या एका विद्यार्थिनीसाठी तिसरी जागा राखीव ठेवण्यात आली होती. या निवड प्रक्रियेत धारूरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवत तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे.

या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कार्यालय, धारूर येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय कोकणे, ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी शिवाजी अंडील, विस्ताराधिकारी सय्यद हकीम, विनायक गडदे, केंद्रप्रमुख सुदर्शन काळे, क्षीरसागर सर यांच्यासह शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी थेट नासा आणि इस्रोसारख्या जागतिक स्तरावरील अवकाश संशोधन संस्थांच्या शैक्षणिक सहलीपर्यंत मजल मारणे ही अभिमानाची बाब आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांच्या बळावर हे यश मिळाले आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे धारूर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT