Youth Suspicious Death : बोगस क्रीडा प्रमाणपत्र रॅकेट उघडकीस आणणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

मृतदेह झाडाला लटकलेला आढळला
crime news
Crime News : बोगस क्रीडा प्रमाणपत्र रॅकेट उघडकीस आणणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यूfile photo
Published on: 
Updated on: 

Crime News: Suspicious death of the youth who exposed a bogus sports certificate racket

बीड, पुढारी वृत्तसेवा : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बोगस क्रीडा प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांचे राज्यव्यापी रॅकेट उघडकीस आणणाऱ्या बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण (२५) या तरुण खेळाडूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इमामपूर शिवारात गुरुवारी एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. वैभवच्या अंगावर आणि पायांवर मारहाणीच्या गंभीर खुणा आढळून आल्याने नातेवाकांनी थेट घातपाताचा आरोप केला आहे.

वैभव चव्हाण याने दोन वर्षांपूर्वी (२०२४-२५ मध्ये) धाराशिव येथे पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. मात्र, त्याच्याएवढेच गुण असणाऱ्या एका उमेदवाराने 'कुराश' खेळाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्यामुळे वैभवची प्रतीक्षा यादीतील संधी हुकली होती. वैभवने या अन्यायाविरुद्ध खचून न जाता बालेवाडी (पुणे) क्रीडा आयुक्तालयाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्याने बनावट खेळाडू नागनाथ विष्णू साबळे याच्या प्रमाणपत्राची चौकशी लावून धरली. या एका तक्रारीमुळे क्रीडा विश्वातील आणि शासकीय नोकरभरतीतील फार मोठे रॅकेट उघडकीस आले होते.

वैभव चव्हाण याने पुराव्यांसह केलेल्या या धाडसी पाठपुराव्यामुळे राज्यातील तब्बल १४ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती, तर काही उच्चपदस्थ क्रीडा अधिकारीही निलंबित झाले होते. यानंतर पुणे गुन्हे शाखेने सप्टेंबर २०२६ मध्ये बनावट प्रमाणपत्रे वाटणाऱ्या कुराश असोसिएशनच्या राज्यस्तरीय अध्यक्ष आणि सचिवांना बेड्या ठोकल्या होत्या.

हे रॅकेट उघड झाल्यापासूनच कुराश संघटनेकडून वैभव चव्हाण याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. त्याला सतत धमक्या येत होत्या. वैभवने काही दिवसांपूर्वीच एक ऑडिओ रेकॉर्डिंग करून आपल्या मित्राला पाठवली होती. 'माझा मृत्यू अपघाती किंवा कशाही पद्धतीने झाला, तरी त्याला कुराश संघटनाच पूर्णपणे जबाबदार असेल', असे त्याने या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे म्हटले होते. अखेर गुरुवारी त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने या ऑडिओ क्लिपमधील भीती खरी ठरल्याची चर्चा आहे.

अंगावर मारहाणीच्या खुणा

वैभवचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर बीड जिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी त्याच्या अंगावर बेदम मारहाण केल्याचे व पायाला गंभीर जखमा झाल्याचे समोर आले. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाकांनी थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तब्बल १२ तास मृतदेह ताब्यात न घेता ठिय्या आंदोलन केले. अखेर, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत 'शवविच्छेदन अहवाल हाती येताच कायद्यानुसार कडक गुन्हा दाखल करू' असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रात्री उशिरा नवगण राजुरी येथे वैभववर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.