Beed News : अमोल खुणे हल्ला प्रकरणी तिघांना अटक file photo
बीड

Beed News : अमोल खुणे हल्ला प्रकरणी तिघांना अटक

बीड : लाकडी दांडगे, लोखंडी पाईपने केली होती मारहाण

पुढारी वृत्तसेवा

Three arrested in Amol Khune assault case

बीड, पुढारी वृत्तसेवा मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर 11 ऑक्टोबर रोजी बीडजवळील पाली येथील मंदिर परिसरात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच बीड ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली असून इतरांचा शोध घेतला जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे हे पाली येथील नागनाथ मंदिरात रविवारी दुपारी दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या काहीजणांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात का बोलतोस, असे म्हणत लाकडी दांडे, लोखंडी पाईप व दगडाने मारहाण केली होती. यामध्ये जखमी झालेल्या खुणे यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला होता. तसेच घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी भेट देऊन पाहणी केली होती.

खुणे यांनी केलेल्या वर्णनानुसार व गोपनीय माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी करण बंडु ढेंगे, धोंडीराम सर्जेराव चव्हाण, वैभव अशोक ढंगे (सर्व रा. मौजवाडी, ता. जि. बीड) यांना ताब्यात घेतले होते, चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे व त्यांच्या पथकाने केली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या इतर व्यक्तींची नावे निष्पन्न झाली असून लवकरच त्यांनादेखील अटक केली जाणार असल्याची माहिती दराडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT