Beed Agricultural News : सोयाबीनची फुलं गळू लागली, शेंगांची संख्या घटली; पावसाअभावी शेतकरी धास्तावले file photo
बीड

Beed Agricultural News : सोयाबीनची फुलं गळू लागली, शेंगांची संख्या घटली; पावसाअभावी शेतकरी धास्तावले

चांगल्या उत्पादनाची आशा मावळली? फुलोऱ्यातील सोयाबीनला पावसाची प्रतीक्षा; शेतकरी हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

The vigorous soybean crop began to perish due to the lack of rain

नेकनूर, मनोज गव्हाणे अधूनमधून पडलेल्या पावसाने सोयाबीनसह इतर पिके यावर्षी चांगल्या स्थितीत बहरली आहेत. मात्र सध्या फुले, शेंगा लागले असताना पाऊस गायब झाल्याने जोमदार पिके माना टाकू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे ढग दाटल्याचे दिसून येते. सोयाबीन कमरेपर्यंत पोहचले मात्र फुलांचा बहर पाऊस नसल्याने गळू लागल्याचे चित्र बीड आणि केज तालुक्यातील अनेक गावात पाहायला मिळू लागले आहे.

यंदा मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या अधूनमधून पावसामुळे सोयाबीनसह कापूस, तूर, मूग ही पिके चांगली बहरली होती. शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पादनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने चित्र पूर्णपणे पालटले आहे.

सध्या सोयाबीन पीक फुलोऱ्यात आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. ही अवस्था पिकासाठी सर्वात नाजूक मानली जाते. पण पाण्याअभावी पिके माना टाकू लागली आहेत. शेतात ठिकठिकाणी फुलं गळून पडत असून शेंगांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

"जून-जुलैमध्ये पाऊस चांगला होता. सोयाबीन देखील जोमात वाढले होते. पण ऑगस्टच्या सुरुवातीपासून पाऊस नाही. आता पीक करपायला लागले आहे. खर्च भरून निघेल की नाही याची शंका आहे," असे केज तालुक्यातील बोरगावचे बु. येथील शेतकरी अनिल गव्हाणे म्हणाले. अशीच प्रतिक्रिया अनेक गावांतील शेतकऱ्यांकडून येत आहेत.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, पिकाच्या फुलोऱ्या आणि शेंगा भरण्याच्या स्टेजमध्ये 15-20 दिवस पाऊस न पडल्यास उत्पादनात 40 ते 50 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. पुढील 5-7 दिवसांत पाऊस न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

यावर्षी सोयाबीन चांगले आले आहे , फुलं लागली असताना पाऊस पडत नसल्याने फुलांची गळती सुरू झाली आहे. पिके वाचवण्यासाठी मोठा पाऊस होणे आवश्यक आहे. मात्र पावसाअभावी विहीर, बोअरवेल जास्त वेळ चालत नसल्याने पाणी देता येत नाही.
विश्वनाथ सातपुते,शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT