The stopped rain has started again.. Soybeans are in the mud; Sugarcane is washed away; Farmers are worried
नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपासून थांबलेला पाऊस शुक्रवारी पहाटे पुन्हा सुरू झाल्याने बीड व केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी चिखलात काढणी करून सोयाबीन वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र शुक्रवारी पहाटे पुन्हा सुरू झालेल्या पावसाने काढलेले सोयाबीन चिखलात गाडले गेले. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच उरणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यावर्षी सोयाबीनचे पीक चांगल्या पद्धतीने आले होते. उत्पन्नाच्या आशा बाळगून शेतकऱ्यांनी खर्च केला; पण पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने पिकांची मोठी हानी केली. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी चिखल तुडवत काढणी सुरू केली; मात्र शुक्रवारी झालेल्या पावसाने हातात आलेले पीकसुद्धा लिंबागणेश, चिखलात गाडले. नेकनूरसह केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतरही शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. मदतीसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. नियमांच्या कारणास्तव शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत, अशीही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बोरगाव येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे यांच्या दोन एकर क्षेत्रातील ऊस अतिवृष्टी आणि मांजरा नदीच्या पाण्याने खोदून वाहून गेला. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले; मात्र तलाठ्याने उसाला मदत नसल्याचे कारण देत पंचनामा करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.