The Shri Yogeshwari Margashirsha Mhotsav concluded with the Purnahuti Mahapuja.
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :
अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या दि २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या मार्गशीर्ष महोत्सवाची सांगता शुक्रवारी दुपारी होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे व सुविद्य पत्नीच्या उपस्थितीत पुर्णाहुती व महापुजा संपन्न झाली. महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी करत देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, अंबाजोगाई शहरासोबतच संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता श्री योगेश्वरी देवीची यात्रा गुरुवार दि ४ रोजी मोठ्या सांस्कृतिक परंपरेनुसार व उत्साहात संपन्न झाली, महापूजेनंतर आठ नऊ दिवस मंदिरात बसलेल्या आराध भक्त आपापल्या गावी जाण्यासाठी निघतांना मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
गुरुवारी योगेश्वरी देवीच्या यात्रेला मोठी गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त संध्याकाळी निघालेल्या योगेश्वरी देवीच्या पालखीचे देखील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत साजरा झाला. आज महोत्सवाची सांगता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली.
यावेळी योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरधारीलाल भराडीया, विश्वस्त भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, कमलाकर चौसाळकर, अॅड. शरद लोमटे, उल्हास पांडे, अक्षय मुंदडा, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, पूजा राम कुलकर्णी, शिरीष पांडे, योगेश्वरी देवीचे मानकरी, पुरोहित आदीजण उपस्थित होते.
या पुर्णाहुतीनंतर देवीच्या मंदिरात आराध बसलेल्या महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अंबाजोगाई व पंचक्रोशीतील दर्शनासाठी भाविकांची मोठी संख्या मंदिर परिसरात झाल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागला.
रात्री आठ वाजता योगेश्वरी देवीची पालखी मंदिरातून निघाली. ही पालखी मंडीबाजार, पाटील चौक, भट गल्ली, जैन गल्ली, गाँड गल्ली मार्गे देशपांडे गल्लीतील देवघर, कुत्तर विहिर मार्गे पुन्हा मंदिरात पोहचली. पालखी सोबत आराधी भजनी मंडळ, महिलांचे भजनी मंडळ, ढोलताशे सहभागी झाले होते. पालखिमार्गावर व शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेली विद्युत रोषणाई शहर वासियांचे लक्ष बेधणारी ठरल्याचे दिसून येत होते.