

It is estimated that sugarcane will lose 10 percent of its weight before it is harvested.
गौतम बचुटे
केज, पुढारी वृत्तसेवा नगदी पीक म्हणून शेकऱ्याची उसाला पसंती आहे. ज्यांच्याकडे बारामाही पाणी आहे असे शेतकरी ऊसाला प्राधान्य देतात. रात्री अपरात्री लाईटच्या लहरीपणामुळे शेतकरी जीव धोक्यात घालून ऊसाचे पीक घेतात पण कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेजाऱ्याच्या हाती नुकसान ठरलेले आहे. आता ऊसतोडीच्या आधीच तुरे फुटल्याने वजनात दहा टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
केज तालुक्यात मांजरा प्रकल्पाच्या सिंचनाखाली येणारे क्षेत्र आणि तालुक्यातील नऊ लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओलिताखाली येत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात ऊस झालेली आहे. मागील दोन वर्षा पासून सरासरी पेक्षा जास्त पडलेल्या पावसाने साहजिकच ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. तर येडेश्वरी साखर कारखाना आणि गंगा माउली साखर कारखाना या दोन कारखान्यामुळे शेतकऱ्यांची ऊस गाळपांची चिंता कमी झालेली आहे.
मात्र या वर्षी ऊसाचे पीक जोमदार आलेले असताना दिवस आणि रात्रीच्या वातावरणातीलबदल आणि अतिवृष्टी याच बरोबरचा हवेतील आर्द्रता, सततचा पाऊस, जमिनीत पाणी साचणे, जमिनीतील नत्राची कमतरता आणि चुकीचा लागवडीचा हंगाम याचा फटका ऊसाला बसला आहे.
आता ऊसाला तुरे आल्याने ऊस आतून पोकळ होऊन वजन घटू लागल्याने तुरा आल्याने वजनात सुमारे १० टक्के पर्यंत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्या पुढे संकट उभे ठाकले आहे.
केज तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्प
मांजरा प्रकल्पा सह केज तालुक्यात बाभळगाव, सांगवी (सा), जाधव जवळा, लिंबाचीवाडी, जिवाचीवाडी, मस्साजोग, बनकरंजा, उंदरी, मुलेगाव हे लघु व मध्यम प्रकल्प असून त्या खालील क्षेत्रात ऊसाची लागवड असते
माती व पाण्याची तपासणी आवश्यक या वर्षी सप्टेंबर महिन्यात सतत पडलेला पाऊस आणि दिवस व रात्रीच्या तापमानातील १० अंश सेल्सिअस पर्यंतची घट; यामुळे ऊसाला तुरे फुटले आहेत. त्यामुळे उसाचे वजन घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे अशी माहिती शेतकरी अशोक गित्ते यांनी दिली तर माती परीक्षण आणि सिंचन स्रोताचे पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्या नुसार खते व सूक्ष्म अन्नद्रव्य देणे गरजेचे असल्याचे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ कृष्णा कर्डीले यांनी सांगितले.
उसाचा तुरा येण्याची प्रमुख कारणे
हवामानः तापमान आणि हवेतील आर्द्रतेतील बदल, सततचा पाऊस आणि जमिनीत जास्त काळ पाणी साचून राहणे. तसेच उसाच्या पीक वाढीच्या टप्प्यावर तुरा येण्याची शक्यता जास्त असते. जमिनीतील नत्राची कमतरता. खोडवा उसाला तुरा येण्याचे प्रमाण हे नवीन लागवड केलेल्या उसापेक्षा जास्त असते. तुरा आल्या नंतर ऊस पोकळ होतो. उसातील साखर विघटित होते आणि ग्लुकोज व फ्रुक्टोज मध्ये रूपांतर होत असल्याने साखर उतारा कमी होतो. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या वाण निवडावी. योग्य प्रमाणात व शिफारस केलेले खते आणि पाणी द्यावे. फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये लागवड केल्यास तुरा लवकर येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लागवडीची योग्य वेळ निवडावी अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी दिली.