kapildharwadi hill collapsing File Photo
बीड

kapildharwadi hill: बीडमध्ये चक्क डोंगर खचतोय! दररोज जवळपास एक फूट खोल खचतेय जमीन, 80 कुटुंबांचे स्थलांतर

ऐंशी कुटुंबांचे स्थलांतर; भुगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Why kapildharwadi hill Beed crumbling

उदय नागरगोजे

बीड : बीड तालुक्यात सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या कपीलधारवाडीला भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर या गावातील घरांना तडे गेले होते. तसेच रस्ताही भेगाळला होता. त्यानंतर दररोज या ठिकाणचा जवळपास अर्धा किलोमीटरचा परिसर खचत असून, खबरदारीचा उपाय म्हणून ऐंशी कुटुंबांचे स्थलांतर जवळच असलेल्या मन्मथस्वामी मंदिर परिसरातील धर्मशाळेत करण्यात आला आहे. तर पुणे येथील भुगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने या भागाची पाहणी केली.

सोलापूर-धुळे महामार्गालगत मांजरसुंबा घाटातील डोंगर उतरारावर कपीलधारवाडी हे गाव वसलेले आहे. गावात जवळपास शंभर कुटुंब वास्तव्यास असून, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरालाच पाझर फुटल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. डोंगर हा मुरुमाचा असल्याने आता भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. आठ दिवसांपूर्वी या भागातील काही घरांना तडे गेले होते. तसेच गावाला महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यालाही भेगा पडल्या होत्या. यानंतर मंडळ अधिकारी शीतल चाटे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या भागात भेट देऊन पाहणी केली. यानंतर स्वतः जिल्हाधिकारी जॉन्सन यांनीही भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच ग्रामस्थांना घर सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. आता या गावातील जवळपास ऐंशी कुटुंबांची सोय जवळच असलेल्या मन्मथस्वामी संस्थानच्या धर्मशाळेत केली आहे. त्या ठिकाणी या ग्रामस्थांना विविध सेवाभावी संस्थांकडून संसारोपयोगी साहित्यही देण्यात आले आहे.

परंतु आता राहते घरच सोडण्याची वेळ आल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. जवळच असलेल्या मांजरसुंबा गावात काही जण किरायाने राहण्यासाठी गेले असून, त्या ठिकाणच्या खोलीच्या किरायाचा भुर्दंड आता या ग्रामस्थांना सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, बुधवारी पुणे येथील भुगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने या भागात पाहणी केली आहे. आता हे पथक जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार असून, त्यानंतरच या ठिकाणच्या भुस्खलनाच्या धोक्याबाबतचा नेमका अंदाज येऊ शकणार आहे. तूर्तास तरी या ठिकाणी दररोज जवळपास एक फूट खोल खचत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.

बघ्यांची गर्दी वाढली

कपीलधारवाडी येथे भुस्खलनाचा धोका निर्माण झालेला असून, एकीकडे प्रशासनाने गाव रिकामे केलेले असताना दुसरीकडे बघ्यांची गर्दी वाढत आहे. यामुळे या परिसरात कोणी फिरकणार नाही, याकरिता पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

महसूलचे पथक तळ ठोकून

कपीलधारवाडीच्या ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असले तरी काही ग्रामस्थ अधूनमधून गावात येत असल्याने धोका कायम आहे. या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, मंडळ अधिकारी शीतल चाटे हे तळ ठोकून आहेत. तर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनीही या ठिकाणी भेटी दिल्या आहेत.

पाली गावच्या गायरानात होऊ शकते पुनर्वसन

कपीलधारवाडी हे डोंगर उतारावर वसलेले गाव असून, जवळपास अर्धा किलोमीटरचा डोंगराचा भाग खचत असल्यासने उर्वरित भागातही मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असली तरी त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाली गावच्या गायरानामध्ये जागा उपलब्ध असून, त्या ठिकाणी पुनवर्सन केले जाऊ शकते.

महामार्गासाठी झाले होते ब्लास्टिंग

कपीलधारवाडी हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून या डोंगर उतारावर वसलेले आहे. यापूर्वी कधीही असा धोका निर्माण झाला नाही. अगदी किल्लारीच्या भुकंपावेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती, असे गावातील ज्येष्ठ सांगतात. परंतु काही वर्षांपूर्वी सोलापूर-धुळे महामार्गासाठी या गावालगतचा डोंगर फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात आले. त्यामुळे डोंगरची मूळ रचनाच बिघडली. तसेच ब्लास्टिंगमुळे मजबुतीही कमी झाली होती. त्यातच यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या पावसाचे पाणी डोंगरातून पाझरत आहे. यामुळेच भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT