The case of Sachin Jadhav, an officer working in the GST department, ending his life
बीड, पुढारी वृत्तसेवा : येथे जीएसटी विभागात कार्यरत अधिकारी सचिन जाधवर यांनी आत्महत्या केल्याचे दि. १७ जानेवारी रोजी समोर आले होते. या प्रकरणात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. जाधवर यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट मिळालेली असून त्यात वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव असतांना देखील पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप मयुरी सचिन जाधवर यांनी केला आहे. याच मागणीसाठी पोलिस अधिक्षकांशी चर्चा करूनही मार्ग न निघाल्याने नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले,
बीड येथील जीएसटी विभागात कार्यरत असलेल्या कर अधिकारी सचिन जाधवर यांनी शुक्रवारी रात्री आत्मत्या केली होती. हे प्रकरण दि.१७रोजी सकाळी समोर आले. कपीलधार रोडवर जाधवर यांची कार आढळून आली होती, त्यामध्ये ते मृतावस्थेत आढळून आले होते. दरम्यान, या प्रकरणाला जवळपास सात दिवस झाले तरी गुन्हा दाखल होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
अखेर शुक्रवारी जाधवर यांच्या नातेवाईकांनी पोलिस अधिक्षक नवनित कावत यांची भेट घेत या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याची तक्रार केली. परंतु पोलिसांनी या प्रकरणात नोंद केलेली आहे, अधिक तपास सुरु आहे, तपासात जे काही समोर येईल, त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल असे म्हटले.
परंतु नातेवाईक मात्र तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम होते. यानंतर नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलिस ठाणे गाठत पो. नि. मुदीराज यांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, परंतु त्यांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याने नातेवाईक आक्रमक होत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.
सचिन जाधवर यांनी आत्महत्या केली, त्याला सात दिवस झाले, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. काहीतरी घोटाळा आहे, पोलिस गुन्हा दाखल करत नाहीत. एसपी साहेब चांगले असल्याचे दाखवतात, परंतु गुन्हा मात्र दाखल होत नाही. एसपी साहेब व पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेवर आम्हाला संशय आहे. दोन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ मुंडे यांनी दिला आहे.
जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा त्रास होत असल्याचा उल्लेख जाधवर यांनी सुसाईड नोटमध्ये केलेला आहे, असे असतांनाही पोलिस मात्र यापेक्षा वेगळा काही पुरावा मिळतो का, हे शोधत आहेत. इतर प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नाव असले की पोलिस गुन्हा दाखल करतात, मात्र या प्रकरणात पोलिस अशा पद्धतीने सावध भूमिका घेत असल्याने संशय निर्माण होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.