

केज :- उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध्य धंदे यांच्या विरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी केज येथील मटका किंग गणेश खराडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली अशी. आता पुढचा नंबर कुणाचा ? या धास्तीने अनेकांच्या डोळ्यापुढे दिवसा ' चाँद-सितारे' चमकू लागले आहेत. तर संघटित गुन्हेगारी आणि अवैध्य धंदेवाले धास्तावले आहेत.
उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी एम पीडी डी ए आणि मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या संकल्प केला आहे. केज तालुक्यात कल्याण मुंबई नावाचा मटका चालविणारा मटाकाकिंग गणेश सुधीर खराडे वय (३५ वर्षे) (रा. टेलरगल्ली, केज) यांचे विरुध्द एम पी डी ए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्या बाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक, नवनीत काँवत यांच्या मार्फत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना सादर केला होता.
गणेश खराडे याच्या विरुद्ध केज येथे कल्याण व मिलन मटका खेळणे व खेळवीणे. तसेच एक रुपयाचे ९० रुपये देण्याचे अमिष दाखवुन बेकायदेशीररित्या मटका जुगार चालविणे व साक्षीदारांना धमक्या देणे. शिवीगाळ करणे. अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्याने त्याचे वर्तन सुधारावे या करीता त्याचेवर भा न्या सं १२९ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. तरीसुध्दा त्याने त्याचे वर्तणात सुधारना केली नाही. त्याच्या विरुद्ध केज येथे एकुण १० गुन्हे दाखल असुन त्यापैकी ६ न्यायप्रविष्ठ व ४ गुन्हे तपासावर आहेत.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दि. २२ जानेवारी रोजी त्याचा एम पी डी ए अंतर्गत आदेश पारीत करून त्याला तात्काळ ताब्यात घेवून हर्सल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केले होते. त्या नंतर केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर आदेशा वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व उपनिरीक्षक महेश विघ्ने यांनी गोपनीय माहीतीच्या आधारे गणेश खराडे याला दि. २२ रोजी केज शहरातुन ताब्यात घेतले. त्याला केज पोलिस ठाण्यात हजर केले. त्या नंतर पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी पोलिस कर्मचाऱ्या मार्फत गणेश खराडे याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात केली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस हवालदार संतोष गित्ते शेलार, पठाण, जोगदंड, घोडके, अभिमन्यु औताडे, बिबीषण चव्हाण यांनी केली.
आता पुढचा नंबर कुणाचा ?
गणेश खराडे यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे आता अनेकांच्या डोळ्यापुढे भर दिवसा ' चाँद सितारे' चमकू लागले आहेत. त्यामुळे आता पुढचा नंबर कुणाचा याची केज शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.