The atmosphere is devotional as Muktai's palanquin enters Beed district
गेवराई, पुढारी वृत्तसेवा जय मुक्ताबाई... विठ्ठल विठ्ठल ! या गगनभेदी जयघोषांनी गेवराईच्या रस्त्यावर भक्तीचा महासागर उसळला. संत मुक्ताबाईच्या पवित्र पादकांचे दर्शन घेण्यासाठी शहरात हजारो भाविकांचा जनसागर लोटला आणि संपूर्ण नगरच जणू भक्तीरसात न्हालं. मुक्ताईची पालखी गढी येथे पोहचताच रिंगण सोहळा पार पडला.
तापी तिरावरील मुक्ताई नगर येथून प्रस्थान केलेली ही पालखी ६ जिल्ह्यांतून सुमारे ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करत, २८ मुक्कामांनंतर ३ जुलै रोजी पंढरपुरात विठुरायाच्या भेटीला पोहोचणार आहे. सजवलेला रथ, चांदीच्या पादुका, आणि एक हजारांहून अधिक वारकऱ्यांचा जल्लोष या सोहळ्याचे आकर्षण ठरले आहे.
गुरुवारी सायंकाळी संत मुक्ताबाई पालखीचे गेवराई शहरात आगमन होताच, ढोल-ताशांचा कडकडाट झाला, टाळ-मृदंगांचा निनाद आसमंतात घुमू लागला आणि हरिनामाचा गजर शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. महिलांच्या रांगांमध्ये भगवे झेंडे लहरले, तर लहानग्यांनी हातात टाळ घेऊन मुक्ताईच्या पावलांशी आपली नाळ जोडली.
चिंतेश्वर मंदिरापर्यंत सारा रस्ता फुलांनी सजवलेला, रांगोळ्यांनी नटलेला आणि श्रद्धेच्या मनोऱ्यांनी उठून दिसत होता. फुलांची उधळण, जलसेवा, पादुकांवर अभिषेक, कीर्तन, हरिपाठ... सगळं जणू एका दिव्य अनुभूतीत एकवटलं होतं. शुक्रवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने गढ़ी परिसरात गोल रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
पालखीभोवती घोड्यांची रिंगणं, वारकऱ्यांची गर्दी, आणि मुक्ताईच्या जयघोषांनी आसमंत भरून गेला. रिंगण पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी गढी परिसर गजबजून टाकला होता. अनेकांना डोळे भरून आले, काहींनी पाया पडताना मुक्ताईच्या रथात मनसोक्त भाव अर्पण केला.