गेवराई : एका रात्री आठ ते १० शेतकऱ्यांची घरे फोडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
बीड जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस चो-यांचे प्रमाण वाढत चालले आहे. तीन दिवसापूर्वीच गेवराईतील गायकवाड जळगावात चोरी होऊन लाखो रुपयांचा ऐवज आज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री मनुबाई जवळा येथील पोलिस कर्मचाऱ्याच्या घरासह आठ ते दहा शेतक-यांची अज्ञात चोरट्यांनी बंद घरे फोडली. या चोरीच्या घटनेत नंदु वैराळ यांच्या घरातील वीस हजार रुपयांच्या रकमेसह पाच ग्रॅम सोने, बाबासाहेब खवाटे पाच ग्रॅम सोने, ४० हजाराची रक्कम, पंकज मिरकुटे यांच्या घरातील पाच हजार रुपये असा एकूण एक ते दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, फौजदार स्वप्नील कोळी यांच्यासह पोलीस जमादार नारायण काकडे, हनुमान जावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चोरी झालेल्या घरांची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.
मनुबाई जवळा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सतिश खरात यांचे घर फोडून घरातील डबे, पेटीतील कागदपत्र अस्ताव्यस्त केले मात्र, येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.