

Beed Crime
अंबाजोगाई : दारूसाठी पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आपल्या वृद्ध आईचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (दि.१) मध्यरात्री अंबाजोगाई तालुक्यातील येलडा गावात घडली. चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय ७२ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. ही बाब आज सकाळी निदर्शनास आली. याप्रकरणी अमृत भानुदास सोन्नर याला अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
चोत्राबाई सोन्नर या मुलगा, सून नातवंडासह मागील अनेक वर्षापासून मौजे येल्डा येथे राहतात. त्यांचा मुलगा अमृत हा दारूच्या आहारी गेला आहे. गुरूवारी त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून त्याने मध्यरात्री आई झोपेत असताना डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केला. ही बाब सकाळी निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी निर्दयी मुलाला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.