Teacher Son Assault Case Kage Police Crime News
केज: केज तालुक्यातील गुंडागर्दी आणि दादागिरी थांबायचे नाव घेत नाही. जिल्हा परिषदेच्या एका वस्तीशाळा शिक्षकाने त्याच्या बदली संदर्भात गटशिक्षणधिकारी यांच्याकडे तक्रार का केली ? या रागातून त्याने आणि त्याच्या दोन मुलांनी तक्रारदार आणि त्याच्या भावावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील हनुमान वस्ती शाळेवर गोकुळ सारून नावाचे वस्तीशाळा शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या बाबतीत गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. आज (दि. २९) सकाळी ८.३० च्या सुमारास भारत सुदाम चाटे व त्यांचा भाऊ पप्पू चाटे हे दोघे भाऊ वडवणी येथे शेतातील भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी जात होते. ते दोघे मेंढीच्या ओघळात असलेल्या लमाणबाल नावाने ओळखल्या जात असलेल्या भागात आले असता तेथे वस्ती शाळा शिक्षक गोकुळ सखाराम सारुक आणि त्यांची मुले आप्पाराव गोकुळ सारुक, श्रीकृष्ण गोकुळ सारुक हे हातात कोयता आणि कुऱ्हाड घेऊन आले.
यावेळी त्यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे माझी बदली करण्याबाबत तक्रार अर्ज का दिला ? असे म्हणुन तुम्ही लइ माजलात काय ? असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर सहशिक्षक गोकुळ सारुक याने त्याच्या हातातील कोयत्याने भारत चाटेच्या मानेवर घाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारत चाटे यांनी तो वार चुकविण्याचा प्रयत्न करीत असताना तो वार डाव्या हाताच्या मनगटावर लागला. त्यानंतर गोकुळ सारूक याने पप्पू चाटे याच्यावर देखील कोयत्याने वार केला. यात पप्पू चाटे याच्या मनगट आणि मांडीवर वार लागला.
या प्रकरणी भारत चाटे यांच्या तक्रारी वरून गोकुळ सखाराम सारुक, आप्पाराव गोकुळ सारुक, श्रीकृष्ण गोकुळ सारुक या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.
एक दैनिकाचा वार्ताहर असल्याचे सांगून दबाव
सदर शिक्षक हा गावातील नागरिकांसह विविध व कार्यालयातील अधिकाऱ्यांना तो एक दैनिकाचा वार्ताहर असल्याचे सांगून दबाव टाकीत असल्याच्या देखील तक्रारी आहेत.
जिवाचीवाडी (ता.केज) येथील हनुमानवस्ती शाळेचे शिक्षक गोकुळ सारूक याच्या बाबतीत कार्यालयाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तसेच या महिन्यात २७ मे रोजी देखील गावकऱ्यांचा तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. त्याची चौकशी करण्यात येईल.- लक्ष्मण बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, केज