Beed power outage pudhari photo
बीड

Beed power outage : टाकरवन सबस्टेशनवर क्षमतेपेक्षा दुप्पट भार; सहा-सहा तास वीज खंडित

ओव्हरलोडिंगमुळे महावितरणच्या यंत्रणेवर ताण; अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

टाकरवन : माजलगाव वीज वितरण विभागांतर्गत येणाऱ्या टाकरवन येथील ३३/११ केव्ही सबस्टेशनवर क्षमतेपेक्षा मोठा विद्युत भार पडत असल्याने परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. केवळ ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवर तीन फीडरचा ४०० अँपिअरपेक्षा अधिक भार येत असल्याने वारंवार इनकमर ट्रिप होत आहे. परिणामी, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी फीडर रोटेशन पद्धतीचा अवलंब करावा लागत असून, काही भागातील ग्राहकांना तब्बल सहा-सहा तास वीज खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे.

सबस्टेशनवरील तीन फीडरचा एकत्रित भार ४०० अँपिअरच्या पुढे जात असल्याने ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेवर मोठा ताण येत आहे. भार २५५ अँपिअरच्या पुढे गेल्यानंतर सिस्टीममध्ये असंतुलन निर्माण होऊन इनकमर ट्रिप होण्याचे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येते. ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना फीडर रोटेशन करावे लागत आहे.

एका फीडरला वीजपुरवठा सुरू असताना दुसरा फीडर बंद ठेवावा लागत असल्याने गावातील विविध भागांना तासनतास वीज मिळत नाही. याचा थेट परिणाम शेतीच्या सिंचनावर, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच घरगुती आणि व्यावसायिक कामकाजावर होत आहे. माजलगाव येथून टाकरवनकडे येणाऱ्या ३३ केव्ही मुख्य लाईनवर एकूण चार सबस्टेशन अवलंबून आहेत.

या लाईनची सुरक्षित क्षमता सुमारे ४०० अँपिअर असताना सर्व सबस्टेशनचा एकत्रित भार वाढल्याने लाईनवरही अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वारंवार वीजपुरवठा खंडित करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टाकरवन सबस्टेशनवर तातडीने आणखी ५ किंवा १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवावा, तसेच ३३ केव्ही लाईनचे क्षमतावर्धन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भाराचे योग्य नियोजन करून फीडरनिहाय वीजपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे आणि तांत्रिक बिघाडासाठी स्वतंत्र पथक उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आहे.

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

“वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतीचे सिंचन, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होत आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाकरवन सबस्टेशनची क्षमता तातडीने वाढवून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर करावा. अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT