स्वप्निल गलधर pudhari photo
बीड

Beed News : नारायण गडावरील मनोज जरांगे यांचा मेळावा रद्द करा

शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख तथा जरांगे समर्थक गलधरांचे थेट आव्हान

पुढारी वृत्तसेवा

बीड : मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात मनोज जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आणि त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर आता त्यांच्याच विरोधात उभे ठाकले आहेत. नारायण गडावरील दसरा मेळाव्याच्या आयोजनावरून गलधर यांनी जरांगे पाटलांना थेट आव्हान दिले असून, ‘एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलाल तर खबरदार; जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशारा दिला आहे.

२० ऑक्टोबर रोजी नारायण गडावर होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. ‘दुष्काळात शेतकऱ्यांसाठी काही करता आले तर करा; मात्र मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा नको,’ अशी भूमिका घेत गलधर यांनी हा मेळावा रद्द करण्याची मागणी केली आहे.

भरत गोगावलेंच्या दौऱ्यानंतर समीकरणे बदलली

जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदे गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मध्यंतरी मंत्री भरत गोगावले यांचा बीड जिल्हा दौरा झाला होता. या दौऱ्यात त्यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना बंद दाराआड कडक शब्दांत सूचना दिल्या होत्या. त्यानंतरच गलधरांच्या भूमिकेत हा बदल झाल्याचे बोलले जात आहे.

आंदोलनातील साथ ते राजकीय विरोध

एकेकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे समर्थक राहिलेले स्वप्निल गलधर आज त्यांच्याच विरोधात उभे ठाकले आहेत. हा बदल वैचारिक मतभेदातून झाला की अंतर्गत राजकीय समीकरणांमुळे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शिंदे गटाने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे मेळाव्यापूर्वीच बीडमध्ये राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT