Suresh Jadhav ended his life after not getting money from the credit union
गजानन चौकटे
गेवराई- मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून तीन एकरपैकी दोन एकर शेती विकून गेवराई शहरात स्थायिक झालेल्या खळेगावातील एका शेतकऱ्याने मल्टिस्टेट सोसायटीत अडकलेले नऊ लाख मिळत नसल्याने मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर सोसायटीच्या गेटला गळफास घेऊन जीवन संपवल्याने त्यांचे मुलीला डॉक्टर करण्याचे स्वप्न ते स्वप्नच राहीले.
खळेगाव (ता. गेवराई) येथील सुरेश जाधव यांचे वडील आत्माराम जाधव यांचे चार वर्षांपूर्वी रस्ते अपघातात निधन झाले. त्यामुळे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी अन् सुरेश जाधव हे खळेगाव येथे रहायचे. मात्र, सुरेश जाधव यांना मणक्याच्या आजाराने त्रस्त केल्याने त्यातच मुलगी व मुलगा शिक्षणात अग्रेसर असल्याने त्यांनी वडिलोपार्जित तीन एकरपैकी दोन एकर शेती विकून सहा वर्षापूर्वी जाधव कुटुंबीय गेवराई शहरात स्थायिक झाले.
विक्री केलेल्या शेत जमिनीची आलेली साडे अकरा लाख रुपयांची रक्कम शहरातील छत्रपती मल्टिस्टेट सोसायटी फिक्स डिपॉझिट म्हणून मुदतीवर ठेव ठेवली. मुलगी साक्षीने बारावी उत्तीर्ण केल्याने तिला लातूर येथे नीट परीक्षेची तयारी करण्याकरिता ठेवले. पुढे पैशांची चणचण भासू लागल्याने सुरेश जाधव हे छत्रपती मल्टिस्टेट सोसायटीत ठेव लेली ठेव परत मिळावी म्हणून हेलपाटे घालत होते.
परंतु त्यांना पैसे मिळत नसल्याने लातूर येथे नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या मुलगी साक्षी हिला गेवराईत आणले. दिवसेंदिवस मल्टिस्टेट सोसायटीत चकरा मारत असलेल्या सुरेश जाधव यांना अडीच लाख रुपये दिले. उर्वरित नऊ लाख लवकर मिळत नसल्याने मागील काही दिवसांपासून ते तणावात होते.
दोन्ही मुलांना डॉक्टर करण्याचे त्यांचे ध्येय असल्याने दोन वर्षापासून ते छत्रपती मल्टिस्टेटच्या शाखेत चकरा मारत होते. त्यांना आज या उद्या या असे मल्टिस्टेटच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. अखेर छत्रपती मल्टिस्टेटच्या त्रासाला कंटाळून सुरेश जाधव यांनी मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर मल्टिस्टेट शाखेच्या गेटला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली.
गावाकडील शेती विकून गेवराई शहरात असलेल्या छत्रपती मल्टिस्टेट शाखेत मुलांच्या शिक्षणासाठी ठेव म्हणून साडे अकरा लाख रुपये ठेवले. मात्र, पैसे वेळेला मिळत नसल्याने माझ्या पतीने आत्महत्या केली. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कविता जाधव यांनी केली आहे.
माझ्या वडिलांनी आमचे शिक्षण व्हावे म्हणून एकरकमी ठेव ठेवली होती. मात्र, ती परत मिळत नसल्याने माझा प्रवेश थांबला होता. यातून माझ्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले असून, संतोष भंडारी याच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी मुलगी साक्षी जाधव हिने केली.