आ. सुरेश धस pudhari photo
बीड

Suresh Dhas : मतदारसंघातील शाळा, अंगणवाडींचा ‌‘बॅकलॉग‌’ भरून काढणार

आ. सुरेश धस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; ग्रामसेवक, सरपंचांची घेतली आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या तसेच अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाचा मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या रोजगार हमी योजना विभागांतर्गत नव्याने सुरू झालेल्या ‌‘विकसित भारत-जी व्हीबी ग्राम जी‌’ योजनेच्या माध्यमातून शाळा व अंगणवाडीच्या पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यासंदर्भात आ. धस यांनी आष्टी-पाटोदा-शिरूर तालुक्यातील अधिकारी, सर्व सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकांची संयुक्त बैठक घेतली. मतदारसंघातील अनेक गावांमधून नवीन शाळा खोल्या, अंगणवाडी खोल्या तसेच शाळांच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी मर्यादित असल्याने सर्व मागण्या एकाचवेळी पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळे उपलब्ध पर्यायी निधीचा प्रभावी वापर करून हा अनुशेष भरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

या योजनेंतर्गत कुशल कामांच्या माध्यमातून अंगणवाडी खोली बांधकाम, किचन शेड/किचन सेट बांधकाम, शाळा खोली बांधकाम, शाळा खोली दुरुस्ती, मुलांचे व मुलींचे शौचालय बांधकाम, शाळा संरक्षण भिंत यासह विविध सार्वजनिक स्वरूपाची कामे करता येणार आहेत. त्यामुळे मतदारसंघातील ज्या गावांमध्ये शाळा किंवा अंगणवाडीच्या इमारतींची आवश्यकता आहे, तेथे स्थानिक पातळीवर प्रस्ताव तयार करून ही कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जुन्या झाल्या असून काही वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्यात काही वर्गखोल्यांमधून पाणी गळते, तर काही खोल्या विद्यार्थ्यांना बसण्यास योग्य राहिलेल्या नाहीत. गेल्या 20 ते 25 वर्षांच्या कालावधीत नवीन वर्गखोल्यांची बांधकामे अपेक्षित प्रमाणात झालेली नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन शाळा व अंगणवाडीच्या बांधकामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. सुरेश धस यांनी ग्रामपंचायत पातळीवरील यंत्रणेला सक्रिय होण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांनी समन्वयाने काम करून जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर करून प्रत्यक्ष बांधकामे सुरू करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.बैठकीस गटविकास अधिकारी भारत नागरे, प्रयाग धमाल, माने यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रमुख पदाधिकारी, ग्रामसेवक व रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT