Social Media Pudhari
बीड

कष्टाच्या जीवनात सोशल मीडियाने दिला आनंदाचा क्षण

ऊसतोड मजूर; रिल्समधून मांडत आहेत आयुष्याची कहाणी

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane harvesters; Telling their life stories through reels

अतुल शिनगारे

धारूर, पुढारी वृत्तसेवा: शेतात डोलणारे उसाचे हिरवेगार पीक पाहताना त्यामागील कष्टांची कहाणी फार कमी लोकांच्या लक्षात येते. उसाचा गोडवा सर्वांना आवडतो; पण त्या गोडव्यामागे ऊसतोड मजुरांचे कष्ट, घाम आणि संघर्ष दडलेला असतो.

वर्षानुवर्षे ऊसतोडणीच्या कामात आयुष्य घालवणाऱ्या अनेक कुटुंबांची कहाणी आजही बदललेली नाही. काहींचा जन्म ऊसतोडणीच्या तंबूत होतो तर काहींचे संपूर्ण आयुष्य याच कष्टमय कामात जाते. परंतु या संघर्षातही सोशल मीडियाच्या माध्यमातून हसू जपण्याचे काम ऊसतोड मजूर करत आहेत.

धारूर तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक कुटुंबे दरवर्षी ऊसतोडणीसाठी राज्यातील तसेच इतर राज्यांतील साखर कारखान्यांच्या परिसरात स्थलांतर करतात. सहा ते सात महिने गावापासून दूर राहून ऊसतोडणीचे कठीण काम करतच त्यांचा संसार चालतो. कुटुंबासह तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहून दिवसाला तासनतास ऊस तोडणे, बांधणे आणि ट्रॅक्टर किंवा ट्रकवर लोड करणे ही अत्यंत मेहनतीची प्रक्रिया असते.

कष्टाचे काम, तरीही चेहऱ्यावर हास्य ऊसतोडणीचे काम अत्यंत जिगरी आणि मेहनतीचे मानले जाते. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उन्हात, धुळीत आणि काटेरी उसात काम करताना शरीराचा प्रत्येक स्नायू थकून जातो. या कामात महिलांचीही मोठी भूमिका असते.

सोशल मीडियाने दिला थोडा दिलासा....

अलीकडच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटमुळे ऊसतोड मजुरांच्या आयुष्यात एक वेगळा बदल दिसून येत आहे. दिवसभर कष्टाचे काम करत असताना काही मजूर गाणी लावत, नाचत किंवा रिल्स तयार करत आपला थकवा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ऊस तोडतानाचे, तंबूतील जीवनाचे किंवा विश्रांतीच्या वेळचे छोटे-छोटे व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

या रिल्सना मोठा प्रतिसाद मिळत असून काही मजुरांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातून काहींना आर्थिक लाभही मिळत असल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून त्यांना मानसिक ताण कमी होऊन काम करण्याचा उत्साह मिळत असल्याचेही मजूर सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT