बजरंग सोनवणे file photo
बीड

Bajrang Sonawane | माजलगावात ऊस उत्पादकांनी अडवली खासदार बजरंग सोनवणे यांची गाडी

ऊसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर देण्याची मागणी; गतवर्षीची थकीत बिले देण्याचीही शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane Farmers Protest Majalgaon

माजलगाव : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रोशनपुरी येथे नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना खासदार बजरंग सोनवणे आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप यांच्या वाहनांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रोशनपुरी फाटा येथे अडवले. ऊसदर वाढविण्यासह थकीत ऊसबिले तातडीने देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी या वेळी आपली भूमिका मांडली.

खासदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी साखर कारखान्यासह छत्रपती सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर द्यावा, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. याशिवाय गतवर्षीच्या हंगामातील थकीत ऊसबिले तातडीने अदा करावीत, अशीही मागणी त्यांनी केली.

ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे आणि सिंचनावरील खर्च यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढत आहे. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत उसाला मिळणारा दर पुरेसा नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यातच मागील हंगामातील ऊसबिले थकीत असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट खासदारांच्या वाहनांसमोर आंदोलन केले. या वेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच, या प्रश्नांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, ऊसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर मिळणार का आणि गतवर्षीची थकीत ऊसबिले कधी अदा होणार, याकडे आता माजलगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारखाना प्रशासन आणि संबंधितांकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT