रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात घसघशीत वाढ file photo
बीड

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात घसघशीत वाढ

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; बीड जिल्हा रेशीम उत्पादनात अग्रेसर

पुढारी वृत्तसेवा

Subsidy for silk farmers increases drastically

बीड, पुढारी वृत्तसेवा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोखरा) टप्पा क्रमांक २ अंतर्गत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात शासनाने लक्षणीय वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत यापूर्वी मिळणारे २.२० लाख रुपयांचे अनुदान वाढवून ३.२५ लाख रुपये करण्यात आले असून या निर्णयामुळे राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व मशागत, तुती रोपांची लागवड, संगोपन, शेड उभारणी, अळ्यांचे संगोपन आदींसाठी मोठा खर्च करावा लागत होता. मात्र, यासाठी मिळणारे अनुदान अपुरे ठरत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येत होता. ही बाब लक्षात घेऊन रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या होत्या.

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत मयंक गांधी यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. यासंदर्भात मुख्यमंत्री, कृषिमंत्री, मुख्य सचिव, कृषी सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि. २३ जानेवारी २०२६ रोजी निवेदन देण्यात आले होते.

यापूर्वीही अनेक वेळा शेतकऱ्यांनी थेट शासनाकडे अनुदान वाढीची मागणी केली होती. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत शासनाने अनुदानात वाढ जाहीर केल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे रेशीम शेती अधिक किफायतशीर ठरणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाने शेतकरी हिताची भूमिका अधोरेखित केली असून भविष्यातही अशाच सकारात्मक निर्णयांची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT