अपघातानंतर पलटी झालेला कंटेनर जमावाने पेटवून दिला.  (Pudhari Photo)
बीड

Kej Container Accident | केज-लोखंडी सावरगाव परिसरात भरधाव कंटेनरचा थरार; थरकाप उडविणारा घटनाक्रम समोर

Beed Road Accident News | २५ हून अधिक जणांना चिरडणारा कंटेनर अखेर जमावाच्या रोषाचा बळी

पुढारी वृत्तसेवा

Speeding Container Incident Kej Beed Lokhandi Savargaon

अंबाजोगाई: केज तालुक्यातील नागरिकांवर गुरुवारी एक भीषण संकट कोसळले. मांजरसुंबा घाटातून सुरु झालेल्या एका कंटेनरच्या वेगाने आणि निष्काळजी पणामुळे अनेक ठिकाणी अपघात घडले. या कंटेनरने रस्त्याने चालणाऱ्या व दुचाकीस्वार नागरिकांना अक्षरशः चिरडत पुढे कूच केली. या कंटेनरने केजपासून लोखंडी सावरगाव या दरम्यान जवळपास २५ ते ३० लोकांना धडक दिली. त्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले, तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची सुरुवात मांजरसुंबा घाटातून झाली. घाटातील अरुंद वळणांवर कंटेनरने वेग गाठत तिघांना जबर धडक दिली. घटनेचा थरकाप उडवणारा भाग असा की, कंटेनर थांबत नव्हता. चालकाने गाडी रोखण्याऐवजी आणखी वेग घेत चंदन सावरगाव चौकात एका दुकानासमोर उभ्या असलेल्या वाहनांनाही जबर धडक दिली.

जसेजसे हे वृत्त परिसरात पसरले, तसतसा संताप उसळत गेला. अखेर लोखंडी सावरगाव जवळ गाडीचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर पलटी झाला. त्या ठिकाणी जमलेल्या संतप्त नागरिकांनी कंटेनरला घेरून पेटवून दिले. काही क्षणातच संपूर्ण कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. गाडीतील ड्रायव्हर गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर आणि ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. गोंधळ आणि रोष इतका होता की काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेर अंबाजोगाई नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने कंटेनरमधील आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु, तोपर्यंत वाहन पूर्णतः जळून खाक झाले होते.

या अपघाताने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. सध्या जखमींवर अंबाजोगाई, केज येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाकडून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्व जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणि केज ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर लोखंडी सावरगाव येथे कंटेनर पलटी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अक्षय मुंदडा यांना तत्काळ फोन करून माहिती दिली. ते स्वतः कार्यकर्त्यांसह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT