Beed news
नेकनूर : मनोज गव्हाणे
खरीप हंगामातील उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीन शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा देत आले आहे. यंदाही सुरुवातीच्या अधूनमधून पावसावर हे पीक जोमात आले होते. मात्र गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दिलेल्या उघडीपमुळे चित्र पूर्णपणे बदलले आहे. डोळ्यासमोर बहरलेले सोयाबीन आता पाचोळा होऊ लागल्याने शेतकऱ्यांसमोर भविष्यातील भीतीने चिंतेचे ढग दाटून आले आहेत. बहुतांश ठिकाणी माळरानावर सोयाबीनचा पाचोळा झाला आहे. तर चांगल्या जमिनीवर ५० टक्क्यांपर्यंत फटका बसल्याचे चित्र शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित बिघडणारे ठरले आहे.
जून-जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन चांगले वाढले. अनेक शेतात पीक कमरेपर्यंत पोहोचले होते. फुलोऱ्याची अवस्था सुरू झाली असतानाच पावसाने पाठ फिरवली. पाण्याअभावी पिकाची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडून गळू लागली आहेत. फुलं आणि कोवळ्या शेंगा देखील गळतीला लागल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. माळरानावर सोयाबीनचा पाचोळा होत असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी वेदनादायी ठरले आहे. मोठा पाऊस नसल्याने कुठेच पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पाणी देऊन हे पिके वाचवायचे प्रयत्नही यावर्षी शेतकऱ्यांना करता आले नाहीत.
"खत, बियाणे, मजुरीसाठी कर्ज काढले. पीक चांगले होते म्हणून आशा होती. पण आता ४५ दिवसांपासून पाऊस नाही. डोळ्यासमोर पावसाअभावी सोयाबीनचा सुकून पाचोळा होत आहे. हाती काहीच उरणार नाही," अशी व्यथा नेकनूर परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पेरणीसाठी वाढलेला खर्च आणि आता पिकाचे नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनला फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याची सर्वाधिक गरज असताना या काळात दीर्घकाळ पावसाची उघडीप झाल्याने सध्या उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटल्याची परिस्थिती आहे.
आंबेजोगाई, केज, बीड तालुक्यात दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस ही सर्वच पिके संकटात सापडली आहेत. शासनाने त्वरित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीची मदत देऊन सरसकट पिक विमा लाभ देण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.