Social media is a new option for candidates to campaign
अंबाजोगाई, पुढारी वृत्त सेवा अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारअनेक नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. या काळात स्वतःचे मार्केटिंग करण्यासाठी व मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने सोशल मीडिया हा नवा मार्केटिंगचा फंडा निवडला आहे.
मागील १५ ते २० वर्षांपूर्वीची निवडणूक आणि वर्तमानातील निवडणूक यामध्ये कमालीचा फरक दिसून येत आहे. सद्यस्थितीत नगरपरिषद निवडणुकीत सुद्धा सोशल मीडियाचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो आहे. प्रचाराच्या जुन्या माध्यमांना बाजूला सारत काही क्षणांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले अनेक उमेदवार सोशल मीडियाचा खुबीने वापरकरीत आहेत.
दरम्यान पूर्वीच्या काळी तीन चाकी रिक्षा त्याचबरोबर चार चाकी गाडीतून ध्वनिक्षेपकावर उमेदवारांचे नाव चिन्ह पक्ष आणि निवडून का द्यायचंय यासंदर्भातली कारणे आणि मुद्दे जाहीरपणे सांगताना गल्लोगल्ली फिरताना दिसायचे. मात्र आज काळ बदलत गेला आणि नवनवीन माध्यमे उदयाला आली. यापैकीच सोशल मीडिया हे माध्यम
उमेदवारांसाठी अतिशय चांगला पर्याय म्हणून समोर आले आहे. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याचबरोबर मतदारांच्या गाठीभेटी घेताना तसेच आपला पक्ष, आपले चिन्ह आणि आपला नेता यासंदर्भामध्ये नवनवीन संकल्पनांचा वापर करत प्रभावी व्हिडिओ, ऑडिओ वाजवत उमेदवारांनी मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सोशल मीडियामुळे उमेदवारांना मार्केटिंगचा नवा पर्याय मिळाला असला तरी या लोकशाहीत मतदार कोणाला मतदान करतील हे मात्र गुपीतच असते.