गेवराई : श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील गोदावरी नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उत्खनन शासकीय खनिज संपत्तीची अवाढव्य चोरी, डिजिटल डाटा चोरी यांसह तहसीलदार सारख्या लोकसेवकांनी पदाचा गैरवापर करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा तपासासाठी अति.पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करून त्यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी केली आहे.
याप्रकरणी त्यांनी प्रभारी पोलिस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करत असून नियमित पोलिस अधिक्षक रुजू झाल्यानंतर एस.आय.टी. बाबत कार्यवाही होईल असे आश्वासन प्रभारी पोलिस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके यांनी दिले.
घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणातील तरतुदीचा गैरफायदा घेऊन गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे व इतरांनी संगणमताने विनापरवाना अवैध वाळूघाट सुरु करून 100 कोटी रुपयांचे सिंडीकेट चालविल्याचा गंभीर आरोप गेवराईचे आ. विजयसिंह पंडित यांनी केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील नदीपात्रात अवैध मार्गाने 25 हजार 642 ब्रास वाळूचे अवैध उत्खनन, चोरी करून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी चकलांबा, ता.गेवराई पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवार, दि.19 जून रोजी आ. विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि प्रभारी पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके यांची भेट घेतली.
गुन्ह्याची व्याप्ती, आरोपीतांच्या यादीत चकलांबा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश यांसह तहसिलदार सारख्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तिचा भविष्यात आरोपी म्हणून समावेश होण्याची शक्यता आणि गुन्ह्यात सामील असलेले माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलमे, पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलमे आदी गंभीर स्वरुपांच्या कलमांचा समावेश असल्यामुळे याचा तपास पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे देण्याची आवश्यकता असल्याची बाब आ. पंडित यांनी पोलीस अधिक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली.
गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी जरी 17 कोटी 66 लाख 22 हजार 096 रुपये किमतीच्या मालमत्तेच्या चोरीचा उल्लेख असला तरी भविष्यात तपासामध्ये या सर्व बाबी सुमारे 100 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अति.पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष एस.आय.टी.ची स्थापना करून या गुन्ह्याचा तपास पारदर्शकपणे करावा अशी लेखी मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केली.
तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई होणार
या प्रकरणातील दोषी तहसिलदार यांच्या विरुध्द चौकशी समितीने शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केलेली असतानाही या बाबत कार्यवाही करण्यासाठी विलंब होत असल्याची बाब आ. पंडित यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी, बीड यांचेकडून संदीप खोमणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असेही आ. विजयसिंह पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.
तहसीलदारांवर कारवाईसाठी दबाव वाढला
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी पात्रात वाळूघाटासाठी परवानगी नव्हती. असे असतांना महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परस्पर या ठिकाणी तब्बल पंचवीस हजार ब्रास वाळूचा उपसा केला होता. या प्रकरणात आ.विजयसिंह पंडित यांनी तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली, परंतु तहसीलदार मात्र यामध्ये कुठेच आले नाहीत. आता त्यांच्यावर कारवाईसाठी सर्वपक्षीय दबाव वाढत असल्याचे दिसत आहे. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत तहसीलदारांना निलंबीत करावे अशी मागणी केली आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अहवाल पाठवला आहे.