Beed News : कर्जमाफीच्या जीआरची होळी file photo
बीड

Beed News : कर्जमाफीच्या जीआरची होळी

बच्चू कडूंनी आमदारकीसाठी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : आमटे यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Shetkari Hakk Morcha burns the Government Resolution (GR) on loan waivers

बीड, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या अपेक्षांवर शासनाने पाणी फेरल्याचा आरोप करत शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने रविवारी सकाळी खांडे पारगाव येथे कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी करण्यात आली. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी व शर्ती घालण्यात आल्याने ८० ते ९० टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

नागपूर येथे झालेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनानंतर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल, सातबारा कोरा होईल आणि आर्थिक संकटातून दिलासा मिळेल, अशी मोठी अपेक्षा होती. मात्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णयात विविध अटींचा भडिमार करून कर्जमाफीची व्याप्तीच मर्यादित केल्याचा आरोप शेतकरी हक्क मोचनि केला आहे.

यावेळी मोर्चाचे नेते राजेंद्र आमटे यांनी सांगितले की, नागपूर आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्यावर विश्वास ठेवला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्याची अपेक्षा होती. मात्र शेतकरी हिताचा विचार करण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याला आणि आमदारकीला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वापर राजकीय सौदेबाजीसाठी करून शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम करण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या जीआरमधील अटी पाहता बहुसंख्य शेतकरी लाभापासून वंचित राहतील. त्यामुळे हा निर्णय कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची भावना ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. कर्जबाज- ारीपणा, वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

खांडे पारगाव येथे आंदोलनादरम्यान शासनाच्या निर्णयाचा निषेध करत जीआरची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. तसेच कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या सर्व जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्वसामान्य आणि पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी राजेंद्र आमटे, माणिक आमटे, सुभाष काळे, सुभाष सपकाळ, नवनाथ सपकाळ, बबन आमटे, संजय आमटे, प्रदीप आमटे, भिवाजी धारवाडकर, पिनू आमटे, रवी सपकाळ, प्रकाश काळे, दामोदर आमटे, दिलीप झणझणे, महादेव झणझणे, नवनाथ बुरांडे, हनुमान अवघड, लक्ष्मण आमटे, अर्जुन अवघड, बाळू आमटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT