Beed santosh deshmukh murder case updates
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या बहुचर्चित हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचाच सदस्य असल्यावर विशेष मोक्का न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा करत कराडने दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, या निर्णयावेळी नोंदवलेली निरीक्षणे त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर शिक्कामोर्तब करणारी आहेत.
वाल्मीक कराडने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. यावेळी न्यायालयाने काही अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहे. यामध्ये वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य आहे, खंडणीच्या वसुलीत अडथळा ठरत असल्यानेच संतोष देशमुख यांचे अपहरण करून कट रचून त्यांची हत्या करण्यात आली, या टोळीवर २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, त्यापैकी ७ गुन्हे मागील १० वर्षांतील गंभीर स्वरूपाचे आहेत, एकट्या बीड जिल्हा न्यायालयात कराडवर ११ फौजदारी खटले प्रलंबित असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच नव्हे, तर या प्रकरणातील ठोस पुराव्यांचाही आधार घेतला. यामध्ये अवादा एनर्जी प्रकल्पाला दिलेल्या धमक्या, फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या, महत्त्वाचे साक्षीदार आणि त्यांचे गोपनीय जबाब आणि डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे या सर्व निरीक्षणांच्या आणि सबळ पुराव्यांच्या आधारे, वाल्मीक कराड विरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आणि खटल्याला मोठी दिशा मिळाली आहे.