बीड; पुढारी वृत्तसेवा: मसाजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाबरोबरच अवादा कंपनीस मागितलेले खंडणी तसेच सुरक्षारक्षक सोनवणे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील ॲट्रॉसिटी या तिन्ही प्रकरणांचे चौदाशे पानांचे दोषारोपपत्र मकोका न्यायालयात आज (दि.२७) दाखल करण्यात आले. (Santosh Deshmukh Murder Case)
एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली, तपास अधिकारी किरण पाटील तसेच खंडणी प्रकरणाचे तपास अधिकारी अनिल गुजर पाटील यांनी आज दुपारी बीडच्या न्यायालयामध्ये दाखल होत संतोष देशमुख खून प्रकरणाचे चार्जशीट दाखल केले. यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते. (Beed Crime News)
दि. ९ डिसेंबररोजी संतोष देशमुख यांची डोणगाव टोलनाक्यावरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत नऊपैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मागील ८० दिवसांत सीआयडी तसेच एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानंतर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत होते. परंतु, दुसरीकडे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आपला तपास वेगाने पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल केले आहे.
आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान ८० दिवसांच्या आत हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्याने आता आरोपींना जामीन सुद्धा मिळणे कठीण होणार आहे. याबद्दल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.