

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर बाळासाहेब कोल्हे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमातून याबाबतची घोषणा केली. दरम्यान, आपल्या नियुक्तीवर विरोधकांनी केलेल्या राजकीय टीकेला महत्त्व देत नाही. मी कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही, असे अॅड. निकम यांनी नियुक्तीनंतर सांगितले.
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीसह संतोष देशमुख हत्याकांडाच्या जलद चौकशीसाठीच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून आणि सहायक विशेष सरकारी वकील म्हणून कोल्हे यांची नियुक्ती केली. दरम्यान, मस्साजोग येथे सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले आहे.