Sand tractors were released after taking money in Ashti.
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथे रात्री तीन ट्रक्टरच्या माध्यमातून वाळू चोरी करण्यात आली मात्र पोलिसांना या बाबत माहिती दिल्यावरही पोलिस निरीक्षक भुतेकर यांनी यावर कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून काही तरी चिरीमिरी घेऊन ही चोरी दादाप्विल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यात अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया हे वाळू तस्करी करत असून या संबंधी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना ग्रामस्थांनी वेळोवेळी माहिती दिली मात्र या माहितीची योग्य ती दखल आष्टी पोलीस स्थानकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक भुतेकर हे घेत नसून त्यांनी जोरदार वाळूमाफियांना रान मोकळे केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कालच्या घटने मध्ये देखील पोलीस निरीक्षक भुतेकर यांना या वाळू चोरीबाबत सूचना दिल्या मात्र भुतेकर यांनी या ठिकाणी धाड टाकली परंतु वाळू माफियां यांच्या सोबत चक्क तडजोड करून ट्रक्टर सोडून दिल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. पोलीस अधीक्षक कांवत यांना ग्रामस्थांनी रात्री एक वाजता फोन करून काय घडले हे कळविले मात्र त्याच्या नंतर त्यांनी भुतेकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
प्रत्यक्षात काय कारवाई केली तर हे ट्रक्टर सोडून देण्याची कारवाई करण्यात आली. या संबंधी सकाळी ग्रामस्थांनी याचा जाब विचारला असता योग्य ती कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले हे विशेष. बीड जिल्ह्यात यापूर्वी पोलीस दलातील भोंगळ कारभाराचे राज्यभर वाभाडे निघाले असताना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था हि अजूनही कशा ढिसाळ पद्धतीने सुरु आहे याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. सुरुवातीस पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांचा दरारा बीड जिल्ह्यातील पोलीस दलात दिसून येत होता मात्र आता कांवत यांच्या आदेशाला केराची टोपली संबंधित ठाणे प्रमुख दाखवत असल्याचे आता समोर येत आहे.
एसपी कांवतांच्या आदेशाला केराची टोपली
आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील वाळू तस्करी प्रकरणी पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांना ग्रामस्थांनी रात्री एक वाजता वाळू चोरीची माहिती दिली, त्याच वेळी त्यांनी संबंधित पोलिस निरीक्षक भुतेकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले, मात्र भुतेकर यांनी ट्रक्टर सोडून देण्याच्या कारवाईचे आदेशात बदल करून कांवत यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली !