Parli Vaijnath Railway Station Woman Molestation Case
परळी वैजनाथ : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात ड्युटीवर असताना एका महिलेची छेड काढल्याचा आणि मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याचा आरोप असलेल्या आरपीएफ जवानावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सुनील कुमार असे संबंधित जवानाचे नाव आहे. घटनेची गंभीर दखल घेत आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली. त्याचबरोबर त्याची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार हा परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येते. याच अवस्थेत त्याने एका महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संबंधित महिला आणि स्थानकावर उपस्थित प्रवासी संतप्त झाले. त्यांनी जवानाला जाब विचारल्यानंतर परिस्थिती चिघळली.
घटनेदरम्यान संतप्त नागरिकांनी सुनील कुमार याला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी तसेच संबंधित प्रकरणाची दखल घेतली.
यानंतर सुनील कुमार याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिकंदराबाद येथील आरपीएफचे सिक्युरिटी कमिशनर नवीन कुमार यांनी सुनील कुमार याला तातडीने निलंबित केले.
निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच संबंधित जवानाविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून, कर्तव्यावर असताना गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर भूमिका घेण्यात आली आहे.
परळी वैजनाथ येथील आरपीएफ निरीक्षक संतोष कांबळे यांनी संबंधित जवानाच्या निलंबनाची माहिती दिली. रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या जवानाकडूनच अशा प्रकारचे गैरवर्तन झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित जवानावर तातडीने निलंबनाची कारवाई केल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.