

Parli Vaijnath RPF Jawan Molestation Case
परळी वैजनाथ : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात ऑन ड्युटी असलेल्या एका आरपीएफ जवानाने दारूच्या नशेत एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सुनील नावाच्या आरपीएफ जवानाने मद्यधुंद अवस्थेत एका महिलेशी छेडछाड केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने तसेच उपस्थित प्रवाशांनी जवानाला जाब विचारला. संतापाचा उद्रेक झाल्यानंतर काही प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला. प्रवाशांच्या संतप्त भूमिकेमुळे संबंधित जवानाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढला.
दरम्यान, ऑन ड्युटी असलेल्या जवानाकडूनच अशा प्रकारचे गैरवर्तन झाल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित जवानावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
या घटनेबाबत अधिकृत तक्रार, गुन्हा दाखल झाला आहे का आणि संबंधित जवानावर रेल्वे प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.