Revenue administration's work stoppage protest intensifies over Talathi beating
वडवणी, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यात शासकीय कर्तव्य बजावत असताना तलाठी गौतम वडमारे यांच्यावर झालेल्या जातिवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणामुळे संपूर्ण महसूल प्रशासनात तीव्र संतापाची लाट उसळली असून, गेल्या चार दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे.
वडवणी तालुक्यातील गट नंबर ६५६ येथील गायरान (शासकीय) जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या तलाठी गौतम वडमारे यांना अडवून आरोपींनी जातीचा उल्लेख करत शिवीगाळ केली व मारहाण केल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांचा रोष अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वडवणीजादी अमृत महोत वडवणी तालुक्यातील सहायक महसूल प्रशासनाने २४ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारासमोर महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर कर्मचारी यांनी ठिय्या मांडून जोरदार निषेध नोंदविला आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, शासकीय जमिनीचे संरक्षण व अतिक्रमण हटविणे ही महसूल विभागाची कायदेशीर व प्रशासकीय जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडत असताना कर्मचाऱ्यांवर हल्ले होणे हे अत्यंत गंभीर असून, जातिवाचक शिवीगाळ व मारहाण हा केवळ एका तलाठ्यावर नव्हे, तर संपूर्ण प्रशासनावर झालेला हल्ला आहे.
या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
कामबंद आंदोलनामुळे तालुक्यातील महसूल विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत. दैनंदिन शासकीय कामकाजावर मोठा परिणाम होत असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनावर ताणही वाढला आहे. दरम्यान, आरोपींच्या अटकेबाबत पोलिस प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
जोपर्यंत आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी महसूल कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.