Kej court verdict
गौतम बचुटे
केज: बीड जिल्ह्यात २०२३ मध्ये गाजलेल्या महालक्ष्मी कला केंद्र पोक्सो प्रकरणातील सर्व २७ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे रत्नाकर शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
७ जुलै २०२३ रोजी पहाटे २:३० वाजता तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी महालक्ष्मी कला केंद्रावर छापा टाकला होता. या धाडीत ३६ जणांविरुद्ध पोक्सो कायदा २०१२, अल्पवयीन न्याय कायदा २०१५, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६, अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदवले गेले.
आरोपानुसार, कला केंद्रात चार अल्पवयीन मुलींना नृत्यासाठी बोलावून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अनोळखी व्यक्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले, तसेच चालक सत्वशीला आंधारे आणि रत्नाकर शिंदे यांनी आर्थिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलींचा वेश्याव्यवसायासाठी वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडिता दलित समाजातील असल्याने तिच्यावर दबाव आणून व पैशाचे आमिष दाखवून शोषण झाल्याचा आरोपही होता.
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाकडून आठ साक्षीदार तपासले गेले; मात्र सरकार पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आले. आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद सादर करत बचाव यशस्वी केला. परिणामी न्यायमूर्ती एस. बी. भाजीपाले यांनी ११ ऑगस्ट रोजी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
या प्रकरणातील चार आरोपी लहू अंधारे, शीतल अंधारे, संगीता काळे आणि संतोष बडगे निकालापर्यंत कारागृहात होते, तर इतर आरोपी जामिनावर होते. आरोपींच्या बाजूने ॲड. अजित लोमटे यांनी काम पाहिले, तर ॲड. संस्कार शिनगारे, ॲड. चंद्रकांत जाधव, ॲड. ओमप्रकाश धोत्रे आणि ॲड. अभिजित सोळंके यांनी सहकार्य केले.