गोदावरीत पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको pudhari photo
बीड

Godavari Water Issue : गोदावरीत पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको

शिवसेनेचे राक्षसभुवन फाट्यावर आंदोलन; तहसीलदारांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : मराठवाड्यातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीपात्रात तत्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने राक्षसभुवन फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. चंद्रकांत आप्पा नवले यांनी केले.

यावेळी बोलताना ॲड. नवले यांनी सांगितले की, तालुक्यातील विहिरी, बोअरवेल आणि नदीपात्र कोरडे पडल्याने शेतकरी व नागरिक गंभीर संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम तोंडावर असताना पाण्याअभावी शेती धोक्यात आली असून शासनाने तातडीने गोदावरीत पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

आयोजक बाळासाहेब खेडकर यांनी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.आंदोलनादरम्यान गोदावरी नदी पात्रात पाणी सोडणे, शेतीसाठी नियमित पाणीपुरवठा करणे, कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना विशेष मदत जाहीर करणे तसेच जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, तहसीलदार संदीप खोमणे व पोलीस निरीक्षक पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात संजय बाबा लकडे, उद्धव मडके, विक्रमराजे भोसले, मुकेश महाजन, परसराम मासाळ, राजेंद्र डाके, गणेश पवार, राजाभाऊ तलावडे यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT