Ramalinga tiger entered Patoda taluka!
कडा, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यात शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर काही दिवसांपासून गायब झालेल्या रामलिंग वाघाने पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. पटोदा तालुक्यातील मांडवाडी परिसरात या वाघाने गायीची शिकार केल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे डॉगरकिन्ही, मांडवाडीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तब्बल ४०० चौरस किलोमीटरचा परिसर पिंजून काढणारा हा वाघ नेमका कोणत्या दिशेने मार्गक्रमण करतोय, याचा शोध घेण्याचे आव्हान वनविभागासमोर उभे राहिले आहे.
आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथील टकले वस्तीवरील देवीदास ऊर्फ पिटू माणिक टकले (वय ३८) हे गुरांसाठी चारा आणण्याकरिता सोनीपठार डोंगर परिसरात गेले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर वनविभागाने वाघाचा शोध घेण्यासाठी परिसरात गस्त वाढवली होती.
ट्रॅप कॅमेरे लावून त्याच्या हालचाली टिपण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, कॅमेऱ्यांना हुलकावणी देत हा वाघ काही दिवसांपासून नजरेआड झाला होता. आता पटोदा तालुक्यातील मांडवाडी परिसरात गायीची शिकार केल्याची घटना समोर आल्याने रामलिंग वाघ पुन्हा चर्चेत आला आहे. आष्टी तालुक्यातील डोंगराळ भागापासून पटोदा तालुक्यात पर्यंत त्याचा संचार सुरू असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. एका ठिकाणी स्थिर न राहता मोठ्या भौगोलिक क्षेत्रात भ्रमंती करणाऱ्या या वाघामुळे त्याच्या मार्गावरील गावांतील शेतकरी, आणि पशुपालकांची चिंता वाढली आहे.
खबरदारी घ्यावी; वन विभागाचे आवाहन
मांडवाडी, डॉगरकिन्ही, चुंबळी आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. जनावरे जंगलालगत किंवा उघड्या शिवारात चरायला सोडताना काळजी घ्यावी. एकट्याने शेतात जाणे टाळावे, तसेच रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. ट्रॅप कॅमेरे आणि नियमित गस्तीच्या माध्यमातून त्याच्या संचाराचा मागोवा घेतला जात आहे.
पुढचा मुक्काम कुठे ?
आष्टी तालुक्यातून गायब झालेला रामलिंग आता पटोदा तालुक्यात पोहोचल्याने त्याचा पुढील संचार कोणत्या दिशेने होणार, याबाबत परिसरात उत्सुकतेसोबतच भीतीही आहे. आधी शेतकऱ्याचा बळी आणि आता पाळीव जनावराची शिकार, या घटनांमुळे वाघाच्या संचार क्षेत्रातील गावकऱ्यांची झोप उडाली आहे. वन्यजीवाला त्रास न देता सुरक्षित अंतर राखणे, त्याच्या हालचाली दिसल्यास स्वतःहून जवळ जाण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती देणे गरजेचे आहे.