स्‍व. गोपीनाथ मुंडे आणि माजी खासदार राजू शेट्टी pudhari photo
बीड

Raju Shetti : गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये होणारी घुसमट जवळून पाहिली

माजी खा. राजू शेट्टी यांचा मोठा दावा

पुढारी वृत्तसेवा

परळी : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपमधील राजकीय घुसमटीबाबत मोठा दावा केला आहे.

परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या राजू शेट्टी यांनी आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी गळाभेट घेत संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शेट्टी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

राजू शेट्टी म्हणाले की, युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या झोनबंदीच्या निर्णयाविरोधात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन झाले होते. त्यावेळी मुंडे यांनी समिती स्थापन करून झोनबंदी उठविण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.

सन २००४ ते २००९ या काळात आमदार म्हणून, तर २००९ ते २०१४ या काळात खासदार म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले. त्यांच्या आग्रहाखातरच मी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. ती माझी मोठी चूक होती. मात्र, साहेब गेल्यानंतर मी ती चूक सुधारली,* असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

तसेच, २००४ ते २०१४ या कालावधीत गोपीनाथ मुंडे यांची भाजपमध्ये होणारी घुसमट मी जवळून पाहिली होती,* असा दावाही शेट्टी यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT