Rains are coming again in Beed district Crops and houses destroyed
शशी केवडकर
बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यावर पुन्हा एकदा पावसाने रुद्रावतार धारण केला असून रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून थांबता-थांबता सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आधीच्या पावसात शेतकऱ्यांचे पीक आणि जनावरं उद्ध्वस्त झाली होती, संसार उद्ध्वस्त झाला होता, तरीही शेतकरी जगण्याची उमेद धरून होता. मात्र काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ही शेवटची आशेची किरणेदेखील संपुष्टात येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कापूस, सोयाबीन, तूर, मूग अशी खरिपाची पिके आधीच सडली होती. आता सततच्या पावसामुळे उरलीसुरली पिकेही नष्ट होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. "कधी पिकं वाचावीत म्हणून देवाकडे साकडे घालणारा बळीराजा आता किमान आम्ही तरी जगू दे, म्हणून पाऊस थांबण्यासाठी देवाची प्रार्थना करताना दिसतोय.
जिल्ह्यातील अनेक भागांत घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू झाली आहे. मुख्य रस्ते आणि गावांना जोडणारे छोटे-मोठे पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून जात आहेत. गेवराई, माजलगाव, केज, धारूर, वडवणी, शिरूर आणि बीड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावे पाण्याच्या वेढ्यात अडकली आहेत. घरांच्या पडझडी मध्ये अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना या आता समोर येत आहेत. तर ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या मोटारसायकल, औजारे, ट्रॅक्टर ट्रॉली हे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
माजलगाव धरण, मांजरा धरण, बिंदुसरा व सिंदफणा प्रकल्प शंभर टक्के भरले असून दरवाजे उघडण्यात आले आहेत. या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने थैमान घातलेल्या भागाबरोबरच कोरड्या भागातही या विसर्गाचे पाणी गावात शिरून नागरिकांना बेघर करत आहे. माजलगाव धरणातून ही वृत्त लिखाण करेपर्यंत ९६७९५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून मांजरा धरणातून ३५८८९ क्युसेकने विसर्ग होत आहे. बिंदुसरा, सिंदाफणा, डोकेवाडा ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे नद्यांनी पात्र सोडून महापुराचे रूप धारण केले आहे.
पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांत तात्पुरते निवारा केंद्र उघडले आहेत. मात्र या शाळांत पुरेशा सुविधा नसल्याने अडचर्णीचा सामना करावा लागत आहे. सर्व तालुक्यामध्ये निवारा केंद्र सुरू करण्यात आली असून अतिवृष्टीचा फटका बसलेल्या गावांमध्ये तसेच ज्या ठिकाणी पाण्यात गावे आहेत त्या गावाजवळील सुरक्षित अशा ठिकाणी हे केंद्र सुरू केले आहेत.
कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास जवळील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा. विनाकारण पाण्याच्या दिशेने जाऊ नका, पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून प्रवास करू नका. धोका पत्करून कुठलेही धाडस करणयाचा प्रयत्न करू नका. आपली जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन